अयोध्येतील जमीन अधिग्रहणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान #5मोठयाबातम्या

बाबरी मशीद

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :

1. अयोध्येतील जमीन अधिग्रहणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान

1993मध्ये ज्या केंद्रीय कायद्यानुसार अयोध्येतील बाबरी मशीद-रामजन्मभूमी संकुलासह 67.703 एकर जमीन सरकारने ताब्यात घेतली त्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

जमीन वादाच्या याचिकेबरोबर या याचिकेवर सुनावणी करण्याचे सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालीस पीठाने मान्य केले आहे.

धार्मिक जमीन ताब्यात घेण्याचा अधिकार देणारा कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे काय, असा या याचिकेतील मुद्दा आहे.

केंद्र सरकारने संबंधित जमीन मूळ मालकांना परत देण्याची याचिका दाखल केल्यानंतर लखनौ येथील दोन वकिलांनी ही याचिका सादर केली आहे.

राज्याच्या ताब्यातील जमिनीचे अधिग्रहण करण्याचा अधिकार संसदेला नाही, राज्य विधिमंडळाला धार्मिक संस्थांच्या कामकाजाबाबत निर्णय घेण्याचा विशेष अधिकार आहे असं शिशिर चतुर्वेदी आणि संजय मिश्रा या वकिलांनी सादर केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. भाजप - अण्णाद्रमुकचे 25-15 फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि भाजपा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 25-15 अशा जागावाटप फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं. यामध्ये पॉंडिचेरी जागेचा समावेश आहे. तसेच इतर लहान पक्षांना आपापल्या वाट्यातून जागा देण्याचं या दोन्ही पक्षांनी निश्चित केलं आहे.

ओ. पन्नीरसेल्वम, नरेंद्र मोदी, ई. पलानीस्वामी

या जागावाटपासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्यामध्ये चर्चा झाली.

आपल्या वाट्याला आलेल्या 15 जागांपैकी 4 जागा पीएमके आणि 3 जागा डीएमडीकेला देण्यात येतील.

तर टीएमसी, एनआरसी, पीटी या पक्षांना अण्णाद्रमुक आपल्या वाट्यातील जागा देईल. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे रत्नागिरीतून लढणार

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

मुंबईत शुक्रवारी पक्षाचा पहिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

या मेळाव्यात बोलताना राणे म्हणाले, "देशावर इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला असताना शिवसेना आणि भाजपा यांना मात्र युतीची चिंता लागली आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे."

मुंबईतला मराठी टक्का कमी होण्याला शिवसेनाच जबाबदार आहे असंही नारायण राणे भाषणात म्हणाले. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

4. सदोष याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

रफाल कथित गैरव्यवहार प्रकरणी काही वकिलांनी सदोष फेरविचार याचिका दाखल करून माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, Reuters

याचिका दाखल केल्यावर त्यातील दोष दूर करण्याऐवजी याचिकाकर्ते प्रसिद्धीसाठी माध्यमांकडे गेले अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केली.

रफाल व्यवहाराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर रोजी फेटाळून लावल्या होत्या. या प्रकरणाच्या निकालावर न्यायालयाने फेरविचार करावा या मागणीसाठी आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेकांनी याचिका दाखल केल्या होत्या. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. राज्यातील काँग्रेस उमेदवारांची नावं निश्चित

लोकसभा निवडणुकांसाठी सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकूल वासनिक, माणिकराव ठाकरे, अमिता चव्हाण, राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्चित केली आहे.

तर पुणे, नागपूरसह इतर मतदारसंघांचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला जाईल. या मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक गुरुवारी रात्री पार पडली.

त्या बैठकीसाठी अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)