चंद्रकांत पाटील म्हणतात सरकारी नोकऱ्या डोक्यातून काढा.. #5मोठ्याबातम्या

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजची वृत्तपत्रं आण वेबसाइटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. सरकारी नोकऱ्या डोक्यातून काढा : चंद्रकांत पाटील

संगणकीकरणामुळे दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, त्यामुळे सरकारी नोकऱ्यांचे खूळ डोक्यातून काढा, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सांगली येथे महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. "तरुण तरुणींनी सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढली पाहिजे. वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी नोकऱ्या मिळणे कठीण आहे. तरुणांनी खासगी नोकऱ्यांकडे वळले पाहिजे," असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

2. कुलभूषण जाधव प्रकरणात आजपासून सुनावणी

पाकिस्तानच्या कैदेत असणारे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे. काश्मीरमध्ये CRPFच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी होत असल्याने याकडे विशेष लागून आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

कुलभूषण जाधव

फोटो स्रोत, AFP

21 फेब्रुवारीपर्यंत ही सुनावणी चालणार आहे. पाकिस्तानातील सैनिकी न्यायालयाने गुप्तहेर असल्याचा ठपका ठेऊन जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे.

3. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घ्यावा : अॅड. निकम

काश्मीरचा विशेष दर्जा काढून घ्यावा, अशी मागणी अॅड. उज्ज्वल निकम यांनी केली आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे. ते म्हणाले, "काश्मीरमधील तणावाच्या वातावरणाला काश्मीरला असलेला विशेष दर्जा हेच कारण आहे. देशातील इतर नागरिक जोपर्यंत तिथे राहून प्रॉपर्टी विकत घेऊन नाहीत तोपर्यंत काश्मिरमधील परिस्थिती बदलणार नाही."

4. मराठवाड्यात दीड महिन्यांत 77 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात जानेवारी महिन्यात तब्बल 66 तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी सकाळने दिली आहे. यातील लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्यात आली; मात्र अन्य जिल्ह्यांत प्रकरणांच्या छाननीसाठीची बैठक घेतली नसल्याचे या बातमीत म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आहे.

5. तर भाजपवर बहिष्कार - मराठा समाजाचा इशारा

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सकल मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यास भाजपवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा पंढरपूर येथे आज सकल मराठा मोर्चाच्या बैठकीत दिला.

मराठा मोर्चा

फोटो स्रोत, Getty Images

ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात 13,792 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, तसेच आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाखाची मदत देण्याची घोषणा झाली होती, पण ही आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप बैठकीत करण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)