अभिनंदन यांच्या कौतुकासाठी फेसबुकनं नवीन फीचर तयार केलं?

- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारी संध्याकाळी सुटका करण्यात आली. शत्रूच्या गोटात जवळपास दोन दिवस घालवून आलेल्या अभिनंदन यांच्या शौर्याबद्दलचे अनेक किस्से सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.
अभिनंदन यांचा गौरव करण्यासाठी फेसबुकनं एक नवीन फीचर सुरू केलं आहे, असा दावा करणाऱ्या पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
फेसबुक पायलट यांचा गौरव करत आहे. जर तुम्ही 'Abhinandan' असं टाइप केलं, तर ती अक्षरं नारिंगी होतात आणि फुगे फुटतात, असं या दाव्यांमध्ये म्हटलं आहे. मराठीमध्ये 'अभिनंदन' आणि गुजरातीमध्ये 'અભિનંદન' असं टाइप केल्यानंतरही असंच होत असल्याचा दावाही सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आलाय.

फोटो स्रोत, SM Viral Posts
शेअर चॅट आणि व्हॉट्स ग्रुपवरही हा मेसेज शेअर केला जात आहे. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर या प्रकारच्या पोस्ट फिरत आहेत. अभिनंदन सध्या दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून लवकरात लवकर विमानाच्या कॉकपिटमध्ये पोहोचण्याची त्यांची इच्छा आहे.
अभिनंदन यांची कामगिरी अभिमानास्पद असली, तरी सोशल मीडियावर केले जाणारे दावे हे वास्तवाला धरून नाहीत. अभिनंदनच्या नावानं यापूर्वीही अनेक खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. (USE PAST LINK)
2017 पासून फेसबुकवर वापरलं जातंय Text Delight
विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दलच्या ज्या फीचरची सोशल मीडियावर चर्चा आहे, ते "Text Delight" म्हणून ओळखलं जातं. फेसबुकवर हे फीचर 2017 पासूनच अॅक्टिव्ह आहे.
या फीचरमध्ये फेसबुकनं 15 भाषांतील काही निवडक शब्द आणि वाक्प्रचारांची यादी तयार केली आहे. हे निवडक शब्द फेसबुकवर लिहिले तर इतर अक्षरांपेक्षा मोठे दिसतात आणि त्यांचा रंगही बदलतो. या शब्दांवर क्लिक केलं तर अॅनिमेशनही सुरू होतं.
2018 च्या फीफा वर्ल्ड कप दरम्यान "Text Delight" फीचरमध्ये अॅनिमेशनचा वापर करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Facebook
जेव्हा लोक "GOAL" असं टाइप करायचे, तेव्हा आनंदानं हवेत हात उडविल्याचं अॅनिमेशन स्क्रीनवर दिसायचं.
अॅनिमेशन आणि शब्दांची सांगड
जर तुम्ही फेसबुकवर "Great Time" असं टाइप केलं, तर तुम्हाला हातात फुलं घेतल्याचं अॅनिमेशन स्क्रीनवर येतं. फेसबुकवर "Welcome", "Congratulations" तसंच "Best wishes." हे शब्दही अॅनिमेशनशी जोडण्यात आले आहेत.
"Abhinandan" हा फेसबुक फीचरच्या यादीतलाच एक शब्द आहे. त्यामुळेच हा शब्द टाइप केल्यानंतर स्क्रीनवर फुगे येताना दिसतात. मराठीमध्ये "अभिनंदन" आणि गुजरातीमध्ये "અભિનંદન" टाइप केल्यावरही स्क्रीनवर अॅनिमेशन पहायला मिळतं.
याच फीचरबद्दल 2018 मध्येही असेच चुकीचे दावे पसरविण्यात आले होते. 'BFF' असं टाइप केल्यानंतर जर शब्दाचा रंग हिरवा झाला तर तुमचं अकाउंट सुरक्षित असल्याचं समजा, असं या दाव्यांमध्ये म्हटलं होतं.

फोटो स्रोत, SM Viral Post
'BFF' म्हणजे Best Friend Forever. हा शब्द "Text Delight" फीचरच्या यादीत होता. 'BFF' टाइप केल्यानंतर या शब्दाचा रंग हिरवा व्हायचा आणि टाळ्या वाजविणाऱ्या हातांचं अॅनिमेशन समोर यायचं.
(तुमच्याकडेही येणाऱ्या बातम्या, फोटो, व्हीडिओ संशयास्पद किंवा खोटेआहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची पडताळणी करायला +91-9811520111वर व्हॉट्सअॅप पाठवा. किंवा इथं क्लिक करून बीबीसीला पाठवा.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















