राजनाथ सिंह: गेल्या 5 वर्षांत पाकिस्तानात 3 स्ट्राईक, तिसऱ्याबद्दल सांगणार नाही #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, AFP
आजच्या विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या खालीलप्रमाणे:
1. गेल्या 5 वर्षांमध्ये 3 एअरस्ट्राइक - राजनाथ सिंह
भारताने गेल्या पाच वर्षांमध्ये तीनवेळा एअर स्ट्राइक केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.
मंगळुरूमध्ये बोलताना ते म्हणाले, "भारताने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून तीनवेळा यशस्वी एअरस्ट्राइक केला. मात्र मी तुम्हाला केवळ दोन हल्ल्यांबद्दल सांगणार आहे. तिसऱ्या हल्ल्याबाबत सांगणार नाही."
"आताचा भारत दुबळा राहिला नाही. भारत सशक्त आहे. त्यामुळेच गेल्या 5 वर्षांमध्ये भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना तीन स्ट्राइक केल्या," असं सिंह म्हणाल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.
2. पंकजा मुंडे यांच्या खात्याचे 6,300 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द
महाराष्ट्र राज्य महिला बालविकास मंत्रालयाच्या 6 हजार 300 कोटी रुपयांचे आहार कंत्राट सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले.
अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठा करण्यासाठी 2016मध्ये हे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटाविरोधात वैष्णोरोणी महिला बचत गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
हे कंत्राट देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने 26 फेब्रुवारी रोजी कंत्राट रद्द करण्याचा आदेश दिला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जात आहे.
3. प्रचारादरम्यान जवानांचे फोटो वापरू नका- निवडणूक आयोग
संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचं छायाचित्र निवडणूक प्रचारातील साहित्यात न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने राष्ट्रीय तसंच प्रादेशिक राजकीय पक्षांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचं प्रसिद्धीपत्रक शनिवारी प्रसिद्ध केलं आहे.
संरक्षण विभागातील व्यक्तींची छायाचित्रं विविध पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान वापरले जात असल्याबाबतची माहिती संरक्षण विभागाने निवडणूक आयोगाला दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
याप्रकरणी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना योग्य सूचना देण्याची विनंती संरक्षण विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार हे आदेश आयोगाने दिल्याचे सांगण्यात आले आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
4. पाकिस्तानचं ड्रोन पाडलं
भारताची हद्द ओलांडून राजस्थानमध्ये आलेल्या पाकिस्तानी ड्रोनला भारतीय सुरक्षा दलानं पाडलं आहे. श्रीगंगानगर जवळ हिंदुमालकोट इथे पहाटे 5 वाजता या ड्रोननं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बारतात प्रवेश केला.
हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
ही घुसखोरी झाल्यावर सीमेजवळील परिसरात मोठा गोळीबार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे मदेरा, कोनी, रेणुका, हिंदुमालकोट परिसरतील रहिवाशांमध्ये घबराट पसरल्याचे सांगण्यात आले.
5. गुजरात: काँग्रेसमधून आलेल्या आमदारास मंत्रिपद
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी काँग्रेसला दोन मोठे धक्के गुजरातमध्ये बसले आहेत. या पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातील एक आमदार जवाहर चावडा यांना मंत्रिपदाची शपथही देण्यात आली.
शुक्रवारी चावडा यांच्याबरोबर आमदार पुरषोत्तम सबारिया यांनीही राजीनामा दिला होता. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
जवाहर चावडा माणावदर मतदारसंघातून 1990, 2007, 2012, 2017 असं चार वेळेस निवडून गेले आहेत. OBC समुदायातील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची गुजरातमध्ये ओळख आहे.
गेल्या वर्षी काँग्रेस आमदार कुवरजी बावलिया यांनीही राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आलं.
मेहसानामधील उंझा मतदारसंघातून प्रथमच विजयी होणाऱ्या आशा पटेल यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















