लोकसभा 2019 : पुण्यात संजय काकडे काँग्रेसमध्ये जाणार, प्रवीण गायकवाडही स्पर्धेत

संजय काकडे

फोटो स्रोत, Facebook / Sanjay Kakade

    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पुण्यातील भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केलीये. 'पुणे कट्टा' या उपक्रमात लोकसभेला इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या चर्चेमध्ये काकडे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या पक्षप्रवेशाबद्दल सांगितलं.

भाजपचे राज्यसभा खासदार असलेले काकडे पक्षात नाराज होते. अनेकदा त्यांनी पक्षविरोधी भाष्य केल्याने ते अडचणीतही आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कंटाळून पक्ष सोडत असल्याचं संजय काकडेंनी सांगितलं.

"काँग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन. उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षाचं काम करण्याची तयारी आहे," असं काकडेंनी म्हटलं.

मराठा मोर्चाचं नेतृत्व केलेले आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हेसुद्धा काँग्रेसकडून पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

मराठा मोर्चाच्या माधम्यातून मुस्लीम समाजाला जोडल्याने मराठा आणि मुस्लिम समाजापर्यंत आपला जनसंपर्क चांगला वाढल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.

प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील भेट घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे गायकवाड यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीदेखील चांगले संबंध आहेत.

"तिकीट नाही मिळालं तरी पक्षाचं काम करणार आणि ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्याला पाठिंबा देऊ," असं प्रवीण गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पुणे

फोटो स्रोत, BBC/HalimaKureshi

माजी आमदार मोहन जोशी यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण काँग्रेसचे एकनिष्ठ असल्याचं मोहन जोशी यांचं म्हणणं आहे. १९९९ मध्ये जोशी यांना २ लाख ३० हजार मतं मिळाली होती. पक्षानं संधी दिली तर आपण निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

"जर तिकीट नाही मिळालं तरी काँग्रेसशी एकनिष्ठ राहणार आणि पक्ष तिकीट देईल त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ," असं ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्याही नावाची चर्चा आहे, तर काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते अभय छाजेड हेदेखील लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत.

"राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना पाठिंबा दिल्याचं ऐकण्यात आलंय. मात्र पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या उमेदवाराला पुणे शहर काँग्रेस पाठिंबा देईल," असं पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातून इच्छुकांची नावं पाठवली असून प्रदेश काँग्रेसनं प्रत्येकाला बोलावून मुलाखत घेतली आहे. प्रवीण गायकवाड आपल्याला भेटले आहेत, मात्र संजय काकडे यांच्या प्रवेशाबाबत माध्यमातूनच कळालं, असंही रमेश बागवे यांनी सांगितलं.

पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी देखील पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून पुणे काँग्रेसमध्ये गटतट पडले असून वरवर एकीचं चित्र तयार केलं जात असल्याचं म्हटलंय. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आपल्याला खासदारकीची संधी द्यावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

माजी आमदार मोहन जोशी यांनी देशात काँग्रेस पुन्हा मुसंडी मारणार असल्यानं भाजपचे अनेक खासदार काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. अनेक जण पक्षाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं.

पुण्यात लोकसभेसाठी काँग्रेसच्या तिकिटासाठी मोठी चुरस पाहायला मिळतेय. याबाबत सकाळचे मुख्य प्रतिनिधी मंगेश कोळपकर यांनी काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांचं पारडं जड असल्याचं म्हटलंय.

"संजय काकडे यांना भाजपाच्या ४० नगरसेवकांचा पाठिंबा तसंच स्थानिक जनसंपर्क व्यवस्थेचा फायदा होऊ शकतो. पण काँग्रेसच्या दिल्ली टीमने केलेल्या अभ्यासात मराठा मोर्चानंतर प्रवीण गायकवाड यांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांच्यात तिकिटासाठी चुरस होईल," असं मत कोळपकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)