शरद पवार : माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा का पुरवावा? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, SHARAD PAWAR/facebook
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा का पुरवावा? - शरद पवार
"माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
"एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो. तो हट्ट पुरविण्याची जबाबदारी इतरांची नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला. त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. सुजय विखे पाटील हे राज्यातील प्रॉमिसिंग लिडर होते का?" असंही पवार यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या जागेवर लढण्यासाठी सुजय विखे इच्छुक होते. पण राष्ट्रवादीनं ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला, असं बातमीत म्हटलं आहे.
2. जागरूक नागरिक असण्यापेक्षा मोठी देशभक्ती कोणतीही नाही - प्रियांका गांधी
"देशात सगळीकडे द्वेष पसरवला जात आहे आणि सर्वांनी याविरोधात एकत्र यायला हवं," असं मत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. त्या गुजरातमधील अहमदाबाद येथील सभेत बोलत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
"प्रेम, समता, बंधुता यांच्या पायावर हा देश उभा आहे. आज देशात जे काही घडत आहे त्यामुळे दु:ख होतं. तुमची जागरुकताच या देशाला घडवणार आहे. तुम्ही जागरूक नागरिक असणं यापेक्षा मोठी देशभक्ती नाही. तुमची जागरुकता एक साधन आहे, तुमचं मत एक साधन आहे. ज्यामुळे कुणाला इजा होत नाही, फक्त तुम्हीच या देशाला वाचवू शकता," असं प्रियंका यांनी सभेला उद्देशून म्हटलं आहे.
"नरेंद्र मोदी आणि भाजपनं भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर चर्चा करावी," असंही त्यांनी म्हटलं आहे.
3. भारतातही 'बोईंग' 737 मॅक्स विमान जमिनीवर, DGCA चा निर्णय
इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातही नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसत्तानं बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"विमानामधील त्रुटी दूर करून त्यात सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही," असंही डीजीसीएनं म्हटलं आहे.
इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. रविवारी झालेल्या अपघातात 157 जण ठार झाले. या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स 8 या विमानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
4. देशात भ्रष्टाचार कॅन्ससारखा पसरतोय - मद्रास उच्च न्यायालय
"सामान्य माणूस सरकारी कार्यालयं आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे पूर्णत: हताश आहे," असं मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. द वायर हिंदीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भ्रष्टाचार कॅन्सरसारखा पसरत आहे. सरकारी कागदपत्र देण्यासाठी अधिकारी लाच मागतात, असा आरोप असणाऱ्या कार्यालयांवर छापे मारण्याचा आदेश न्यायालयानं तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
"भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांकडे न्यायालयांनी योग्य प्रकारे लक्ष द्यायला हवं आणि ही प्रकरणं निकाली काढायला हवीत," असंही सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.
5. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आपण सुखाचे घास घेतोय - अजिंक्य रहाणे
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये त्यानं शेतकऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ईनाडू इंडिया मराठीनं ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
"एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या रोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत," असं अजिंक्यनं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















