CST ब्रिज दुर्घटना : स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये, पण पुलासाठी पैसे नाहीत - वारिस पठाण #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Waris Pathan/Facebook
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये, पण पुलासाठी पैसे नाहीत : वारिस पठाण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत, लोकांच्या सुरक्षेचे काय," असा सवाल वारिस पठाण यांनी विचारला आहे.
गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
"बऱ्याचदा सांगूनही या पुलाचे ऑडिट झालेलं नाही. हजारो लोक इथून दररोज प्रवास करतात. आता या पुलावरून एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकार होईल, बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील," असंही वारिस पठाण यांनी म्हटलं आहे.
2. पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची टोलवाटोलवी
मुंबईतल्या या घटनेनंतर पुलाविषयी पालिका आणि रेल्वे प्रशासनानं टोलवाटोलवी सुरू केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
पालिकेच्या स्थानिक नगरेसेविका सुजाता सानप यांच्या मते, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती." तर रेल्वेच्या मते, "हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे."

"दोन वर्षांपूर्वीच स्थानिक नगरसेवकांनी या पुलाच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिलं होतं. मात्र या पुलाचे ऑडिट झालं नाही," असं सानप यांनी म्हटलं आहे.
यावर उत्तर देताना रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय की, "हा पूल बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. तरीदेखील आमचे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करत आहे."
दरम्यान, "हा पूल 100 टक्के धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल समोर आला आहे," असं वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलंय.
"या पुलाची काही दुरुस्ती गरजेची होती. परंतु त्यासाठी पुलाचा वापर करणे बंद करायला हवे होते की नव्हते, याचा तपास करणार आहोत. तसंच हा पूल कोणी बांधला? पुलाच्या देखरेखीचे काम कोणाकडे होते? या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे. याबाबत चौकशी करणार आहोत," असंही तावडे यांनी म्हटलंय.
3. नितीन गडकरींचा ३ लाख मतांनी पराभव होईल - विलास मुत्तेमवार
"नितीन गडकरी हे मोदी लाटेत निवडून आले होते. मात्र, यावेळेस मोदी लाट ओसरली असून ते तोंडघशी पडतील," असा दावा काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. ईनाडू इंडिया मराठीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK / GETTY IMAGES
"2014च्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच लोकसभेची लढवली होती. नितीन गडकरींनी 29 वर्षांत निवडणूक लढवण्याचं कधीही धाडस केले नाही. गेल्या वेळेस ते मोदी लाटेत निवडून आले होते. मात्र, आता ती लाट ओसरली असून नितीन गडकरींचा ३ लाखांच्या मताधिक्याने पराभव होईल," असं मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राजकारणात मी कधीच शत्रृत्व ठेवत नाही, असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.
"नाना पटोले यांच्या उमेदवारीविषयी विचारल्यानंतर गडकरी म्हणाले, प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मला कुणावरही कमेंट अथवा टीका करायची नाहीये."
4. दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबद्दल हायकोर्टाची नाराजी
नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. द वायर हिंदीनं ही बातमी दिली आहे.
एस. सी. धर्माधिकारी आणि बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठानं सुनावणीवेळी म्हटलं की, "सीबीआय, सीआयडी सारख्या यंत्रणा याप्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून तपास करत आहेत परंतु त्यांना सातत्यानं अपयशच का येत आहे? एवढ्या संथ गतीने तपासाबद्दल कोणीच जबाबदार नाही? याबाबत स्पष्टीकरण ही देत नाही?
कोर्टानं लक्ष घातल्यानंतरच अशा प्रकरणांचा तपास केला जातो. त्यामुळे समाजात काय संदेश जातोय याची तुम्हाला जरातरी कल्पना आहे का?"
घटनेची चौकशी एवढ्या संथपणे का होत आहे, याचं कारण सांगण्यासाठी उच्च न्यायालानं राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना 28 मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
5. पोल्लाची लैंगिक छळप्रकरणी एम के स्टॅलिन यांच्या जावयावर गुन्हा नोंद
तामिळनाडूनातल्या पोल्लाचीमध्ये घडलेल्या लैंगिक छळ प्रकरणाचा सत्ताधारी AIADMK पक्षाशी संबंध आहे, असा आरोप केल्याच्या कारणावरून चेन्नई पोलिसांनी DMKचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांचे जावई सबरीसन वेदामूर्ती यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Thinkstock
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूनचं राजकारण ढवळून निघालं आहे.
राज्यात एक गँग सक्रिय आहे आणि ती महिलांचा लैंगिक छळ करत आहे. त्यासंबंधीचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहे, अशा आशयाची राज्यभर चर्चा सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना टीकाही केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















