लोकसभा निवडणूक 2019 : बी.जी. कोळसे पाटलांनी बहुजन वंचित आघाडीचा पाठिंबा नाकारला #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook @BGKolsePatil
सर्व महत्त्वाचे वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे:
1.बी.जी. कोळसे पाटलांनी बहुजन वंचित आघाडीचा पाठिंबा नाकारला
उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी वंचित बहूजन आघाडीचा पाठिंबा नाकारला आहे.. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्धच्या भूमिकेला वंचित बहूजन आघाडी तडा देत असल्याचे कोळसे पाटील यांचे म्हणणे आहे. या विषयची त्यांची सविस्तर भूमिका त्यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर प्रसिद्ध केली आहे. सकाळने ही बातमी दिली आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील यांना जनता दल (धर्मनिरपेक्ष) तर्फे उमेदवारी जाहीर औरंगाबादमधून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची महाराष्ट्र टाइम्सने दिली होती. सगळ्यांचा पाठिंबा असेल तरच निवडणूक लढणार असल्याचं ते म्हणाले होते.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
या पोस्ट मध्ये कोळसे पाटील म्हणतात, "मी 'वंचित बहूजन आघाडी' चा बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारलेला आहे. याचे कारण, मी काल दुपारी माझे 1991 पासूनच परम मित्र अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी, माझे आदर्श पुरुष थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासिकेत बसून चर्चा केली. सर्व गुणदोषासहित काँग्रेस पक्ष, जो की आज एकमेव पक्ष, जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजपला रोखू शकतो, त्यांच्या बरोबर आघाडी करण्यासाठी शेवटचा पण अनेक अयशस्वी प्रयत्नापैकी एक शेवटचा प्रयत्न केला. मी गेली पाच वर्षे सातत्यानें घेतलेली, खूनी मोदी, शाह विरुद्धच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी त्याला तडा देत आहे याची खात्री झाल्यांवर त्यांचा दिलेला पाठिंबा मी ठामपणे नाकारलेला आहे. असं ते फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले.
2. माझी छाती 56 इंचाची नाही, मात्र मनगटात दम आहे- शरद पवार
माझी छाती 56 इंचाची नाही. पण माझ्या मनगटात दम आहे असं बोलून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. चाकणमध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

फोटो स्रोत, RAVEENDRAN/AFP/Getty Images
ते म्हणाले, "आजच्या भाषणात अजित एक गोष्ट बोलला जी मला अजिबात आवडली नाही. तो म्हणाला की या वयात साहेब फिरत आहे. म्हणजे मी काय म्हातारा झालोय का? मी देशात बदल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझी छाती 56 इंचाची नसली तरी माझ्या मनगटात दम आहे. मी बदल घडवेन."
3. तुम्ही भारताबरोबर आहात की शत्रूंबरोबर- संरक्षणमंत्र्यांचा सवाल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागितले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारताबरोबर आहात की शत्रुंबरोबर असा प्रश्न संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ममता बॅनर्जींना विचारला आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका चर्चेत बोलताना सीतारामन यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, "बालाकोटवरचा हल्ला हा दहशतवादाविरुद्धचा हल्ला होता. ज्या पश्चिम बंगालमधून राष्ट्रवादाच्या चळवळीला सुरुवात झाली तेच लोक आम्हाला पुरावे मागत आहेत."
4. क्रिमी लेअर कोट्याबाबत पुनर्विचार
ओबीसी प्रवर्गातील क्रिमीलेअर कोट्याच्या पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. या कोट्यातील अंमलबजावणीतील अडचणी सोडवण्यासाठी आणि या सगळी प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. क्रिमी लेअर हा आर्थिकदृष्ट्या सक्षम गट म्हणून ओळखला जातो. मंडल आयोगाच्या शिफारसी या गटाला लागू होत नाही. त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्य आरक्षण मिळत नाही.
5. सप-बसपसाठी काँग्रेस सोडणार सात जागा
देशातील लोकसभा जागांच्या बाबतीत सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसकडून सप-बसप आघाडीसाठी ७ जागा सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या सात जागा मायावती-अखिलेश यादव यांच्या युतीसाठी लढवणार नसल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. या सात जागांमध्ये मुलायमसिंह यांचा मैनपुरी, डिंपल यादव यांचा कनौज, राष्ट्रीय लोक दलाचे अजितसिंह आणि जयंत चौधरी यांचे दोन मतदारसंघ आणि मायावती ज्या जागेवरून निवडणूक लढवू इच्छितात तो मतदारसंघ अशा जागांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राज बब्बर यांनी रविवारी याबाबत घोषणा केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















