पाऊस आणि गारपिटीनं विदर्भाला झोडपलं, 2 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, SURBHI shirpurkar
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांतल्या काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. तसंच वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यानं यापूर्वी दिला होता.
बुधवारी साडेचारच्या सुमारास पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली.
गारा पडल्यानं पिकांना तडाखा बसल्याचं समोर येत आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका, भाजीपाला अशा पिकांचं नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
दरम्यान, सेलू तालुक्यातील धपकी गावात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या सत्तार शेख (42), देवानंद सहारे (15) यांचा यात समावेश आहे.
आठव्या वर्गात शिकणारा देवानंद सुटी असल्यामुळे सत्तार शेख यांच्यासोबत बकऱ्या चारायला शेतात गेला असताना पाऊस आणि गारा पडायला सुरुवात झाली. यानंतर दोघांनी कडुनिबांच्या झाडांचा आसरा घेतला असताना त्यांच्यावर वीज पडली आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Surbhi Shirpurkar
नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक, पारशिवणी, काटोल, मौदा, भिवापूर या तालुक्यातही गारांचा पाऊस पडला. भंडारा जिल्ह्यात जवळपास अर्धा तास गारांचा पाऊस पडला.
तुषार जिचकार नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील आजनगावमधील शेतकरी आहेत.
"माझ्याकडे मोसंबीची बाग आहे. मला 4 चे 5 लाख रुपयांचं मोसंबीचं उत्पन्न होत होतं. पण आता गारपीटीमुळे मोसंबीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून मला नुकसान भरपाई द्यावी," असं तुषार सांगतात.

फोटो स्रोत, Chetan thakare
याच गावातील नरेंद्र जिचकार सांगतात, ''काल दुपारी तीन वाजता अचानक वादळ वाऱ्यासह पाऊस आला आणि गारपीट झाली''.
"10 ते 15 मिनिटं गारपीट चालली. त्यात आमचं नुकसान झालं. आमच्या शेतात गहू आहे. गारपीटीमुळे गहू उध्वस्त झाला आहे. जिथं आम्हाला 10 क्विंटल गहू होणार होता, तो पूर्णपणे जमीनदोस्त होऊन गेलाय. आसपासच्या 5 ते 6 गावांमध्ये भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे," असं ते सांगतात.
भंडारा जिल्ह्यात बुधवारी दुपारी 4 वाजता गडगडाट सुरू झाली. त्यानंतर वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. काही ठिकाणी आंब्याचा मोहोरही गळून पडला. पाचगावात तर गारांचा खच पडल्याचं दृश्य सर्वत्र दिसतं होतं.

फोटो स्रोत, Nitesh raut
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसला आहे. यामध्ये रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय.
तालुक्यातील गिरड, वायगाव ( गोंड ) परिसरातील धामणगाव , खुर्सापार, रामनगर , परसोडी , निरगुडी ,कांढळी , कुर्ला , उमरी आदी गावांमध्ये मोठया प्रमाणात गारपीट झाली आहे. तालुक्यात झाड कोसळून एक बैल एक ठार झाल्याची माहिती आहे. गिरीधर राऊत यांच्या शेतातील आंब्याचं झाडं कोसळल्याने झाडाखाली बांधून असलेला बैल ठार झाला.

फोटो स्रोत, Nitesh raut
या भागातील शेतकऱ्यांनी गहू या पिकांची कापणी करून शेतात ढीग लावला होता. अचानक झालेल्या गारांच्या पावसानं कापलेले पीक ओले झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. खैरी या गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शेतातच साठवून ठेवलेली तूर ओली झाल्याने शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















