राहुल गांधींची बिहारमध्ये आघाडी जमवताना दमछाक

काँग्रेस, आरजेडी, बिहार

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, राहुल गांधी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

निवडणुकीचं बिगुल वाजलंय, प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. अनेक आघाड्यांचं आधण शिजतं आहे. मात्र देशातला सगळ्यात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला यंदा आघाडीचं गणित जमेना असं दिसतं आहे.

उत्तर प्रदेश ते बिहार आणि पार बंगालपर्यंत काँग्रेसची अवस्था एकसारखीच आहे.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडी आणि काँग्रेस यांच्यासह चार लहान पक्षांशी झालेल्या आघाडीचा बभ्रा झाला. मात्र जागावाटपाच्या गोष्टी झणझणू लागताच आघाडीचं गलबत डगमगताना दिसत आहे.

या आघाडीची दोन शकलं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातील संबंध दुरावल्याचीही चर्चा होती. अखेरीस आघाडी अभेद्य असल्याचं गुरुवारी जाहीर करण्यात आलं. काँग्रेस 9 तर राष्ट्रीय जनता दल 19 जागा लढवण्यावर एकमत होईल, असं वृत्त आहे.

बिहारमधल्या 40पैकी 20 जागा लढवण्याचा निश्चय आरजेडीने केला होता. बिहारमध्ये काँग्रेससाठी आठ जागा सोडण्यास आरजेडी तयार नाही. अकरापेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नसल्याच्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचं वक्तव्य आरजेडीला अडचणीत आणणारं आहे.

काँग्रेस, आरजेडी, बिहार

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, नितीश कुमार पर्वी महाआघाडीत होते.

काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद खूपच चिडले असल्याचं वृत्त आहे. काँग्रेसला आठपेक्षा जास्त जागा सोडता येणार नाहीत असं त्यांनी मुलगा तेजस्वी यादवला सांगितलं आहे.

लालू सध्या रांचीत तुरुंगवास भोगत आहेत. यादरम्यान एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यांच्या अनुपस्थितीत तेजस्वी यादव यांच्याकडे पक्षाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. त्यांनी ट्वीटद्वारे काँग्रेसला इशारा दिला आहे. अहंकारासंदर्भात त्यांनी केलेलं ट्वीटरूपी वक्तव्य काँग्रेस नेतृत्वाला झोंबणारं होतं.

तेजस्वी यांनी लखनौला जाऊन मायावती आणि अखिलेश यादव यांची सविस्तर भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या चर्चेपासून काँग्रेस-आरजेडी यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसची तेव्हापासूनच आरजेडीवर खप्पा मर्जी आहे.

काँग्रेस, आरजेडी, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरजेडीप्रमुख लालूप्रसाद यादव

काँग्रेसशी आघाडी उपयुक्त ठरेल या भावनेतून आरजेडीने आघाडीचा निर्णय घेतला होता. मात्र लोकानुनय कमी होईल अशा स्वरूपाचं काहीही करण्यास आरजेडी तयार नाही.

काही महिन्यांपूर्वी तीन राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये मिळालेला विजय, पाटण्यात रॅलीचं यशस्वी आयोजन आणि प्रियंका गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यापासून काँग्रेसने महाआघाडीतला आपला वाटा जास्त करण्यावर भर दिला आहे. असं होणं स्वाभाविकही आहे.

महाआघाडीचे चार लहान घटकपक्ष म्हणजेच उपेंद्र कुशवाहा, जीतन राम मांझी, शरद यादव आणि मच्छिमार समाजाचे युवा नेते मुकेश सहनी या सगळ्या कल्लोळादरम्यान आपापल्या पक्षांना मनाजोगत्या जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

काँग्रेस, आरजेडी, बिहार

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी कमीत कमी तीन जागा हव्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह हे पाच जागांच्या मागणीवर अडून आहेत. कुशवाहा यांच्याबरोबर कोणी उरलं आहे का? याविषयीही साशंकता आहे.

लहान घटक पक्षांच्या आडमुठ्या धोरणामुळे महाआघाडीला तडा गेला तर अशा परिस्थितीत जीतन राम मांझी आणि मुकेश सहनी आरजेडीच्या बरोबरीने तर उपेंद्र कुशवाहा काँग्रेसच्या बरोबर जाण्याचीही चर्चा आहे.

हे सगळं प्रत्यक्षात असंच घडलं तर भाजप-जेडीयू-एलजेपी युतीची ताकद आपसूकच वाढून त्यांचा विजय सुकर होऊ शकतो.

काँग्रेस, आरजेडी, बिहार

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव

मात्र तशी वेळ येईल असं वाटत नाही. कारण महाआघाडी तुटली तर होणारं नुकसान सगळ्याच घटकपक्षांना माहिती आहे. म्हणूनच हे सगळे पक्ष काँग्रेसच्या छत्रीखाली एकत्र राहतील असं चित्र आहे.

महाआघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यावर घटक पक्षांना दूरगामी परिणाम जाणवू लागल्याने त्यांनी नरमाईचं धोरण अवलंबलं आहे.

महाआघाडीचे सहा घटक पक्ष एक-दोन जागा कमी करून डाव्या विचारसरणीच्या पक्षांसाठी सहा-सात जागा सोडल्या आणि डाव्यांना बरोबर घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला तर खऱ्या अर्थाने अनोखी महाआघाडी ठरू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)