मान्सून यंदा सरासरीपेक्षा कमी? 'एल निनो' इफेक्ट असल्याचा स्कायमेटचा दावा #5मोठयाबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात:
1. यंदा पावसाची सरासरी घसरणार - स्कायमेट
यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असेल आणि दीर्घ कालावधीतील पर्जन्यमानापेक्षा 93 टक्केच पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यात होईल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. मात्र अशी शक्यता 55 टक्के असेल, असंही या कंपनीनं म्हटल्याची बातमी 'महाराष्ट्र टाईम्स'ने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रातील 151 तालुके सध्या दुष्काळाने ग्रासले आहेत. अनेक गावांमध्ये टँकरच्या साह्याने पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे. ठिकठिकाणी चाराछावण्या उघडण्यात आल्या आहेत.
पावसाची सरासरी कमी होण्याच्या शक्यतेमागे एल निनो इफेक्ट कारणीभूत असेल, असं स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंह यांनी सांगितलं.
2. नोटाबंदीच्या वर्षात टॅक्स रिटर्न्स भरणारे दोन दशकांत सर्वांत कमी
नोटाबंदीनंतर 2016-17 या वित्तीय वर्षात एक कोटी सहा लाख नवे करदाते नोंदले गेले, असा दावा सरकारने केला होता. पण प्रत्यक्षात कागदपत्रांनुसार विवरणपत्रं न भरणाऱ्यांची संख्या नोटाबंदीच्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढल्याचंच स्पष्ट झालं आहे, असं 'इंडियन एक्स्प्रेस'नं म्हटलं आहे.
'Stop Filers' म्हणजे एखाद्या आर्थिक वर्षासाठी विवरणपत्रं न भरणाऱ्यांची संख्या गेल्या दोन दशकांमध्ये नोटाबंदीच्या वर्षांत सर्वाधिक होती, असं या बातमीत म्हटलं आहे. नोटाबंदीच्या आधीच्या वर्षात टॅक्स रिटर्न्स न भरणाऱ्यांचा जो आकडा 8 लाख 56 हजार होता, तो 2016-17 या वित्तीय वर्षात दहापट वाढून 88.04 लाख झाला.
कर अधिकाऱ्यांच्या मते विवरणपत्रं न भरणाऱ्यांच्या संख्येत 2000-2001 पासूनच्या दोन दशकातली ही सर्वात मोठी वाढ आहे.
विवरणपत्रं भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याबद्दल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे लेखी विचारणा केली असता त्यांच्याकडून 'इंडियन एक्स्प्रेस'ला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.
3. 'नमो टीव्ही' वैधतेबाबत निवडणूक आयोगाची प्रसारण मंत्रालयाकडे विचारणा
निवडणूक आयोगाने 'नमो टीव्ही' या वाहिनीवरून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला तपशील देण्यास फर्मावलं आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने हे वृत्त दिलं आहे.
राजकीय पक्षांनी स्वत:ची वृत्तवाहिनी काढणं हा आचारसंहितेचा भंग नाही काय, असा प्रश्न काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचललं आहे.
"पंतप्रधान मोदींचा फोटो या वाहिनीचा लोगो आहे. या वाहिनीवर मोदींची भाषणं आणि भाजप नेत्यांच्या मुलाखती प्रसारित होतात. या वाहिनीसाठी आयोगाची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का?" असा थेट सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आयोगाला केला होता.

फोटो स्रोत, AFP
दरम्यान, 'मैं भी चौकीदार' या कार्यक्रमाचं तासभर प्रसारण केल्याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दूरदर्शनसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. 31 मार्चला या कार्यक्रमाचं प्रसारण झालं होतं.
4. उसाला लावलेल्या लागीत बिबट्याच्या बछड्यांचा होरपळून मृत्यू
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे उसाला लावलेल्या आगीत बिबट्याचे पाच बछडे होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्याचं वृत्त 'न्यूज18 लोकमत'ने दिलं आहे.
हे बछडे एक महिन्याचे किंवा त्याहूनही लहान असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
अवसरी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सकाळच्या वेळी ऊसतोडणी कामगार आले होते. या शेतात मादी बिबट्या आपल्या पाच पिल्लांसह वास्तव्यास होती. उसतोडणी करण्यापूर्वी घोणस जातीचा साप दिसल्यामुळे कामगारांनी उस तोडण्यास नकार दिला. संबंधित शेतकऱ्याशी चर्चा केल्यानंतर कामगारांनी ऊस पेटवून दिला.
आगीच्या भीतीने मादी बिबट्या समोरील शेतात पळून गेली परंतु बछड्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमागचं खरं कारण शोधण्यात येईल, असं वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी सांगितलं.
5. पवारांसारख्या नेत्याने अपरिपक्वता दाखवली- राधाकृष्ण विखे पाटील
आघाडीची चर्चा ज्यावेळी करतो त्यावेळी मोकळेपणाने करायला हवी. आघाडीतील मित्र मोकळेपणाने बोलत नाहीत आणि आपल्यातील लोकही स्पष्टपणे बोलत नाहीत. आपण सक्षम नसताना दुसऱ्याच्या मागे फरफटत जातो हे चुकीचं आहे. काँग्रेस नेतृत्वाने पाठीशी ताकदीने उभं राहायला हवं होतं याचं शल्य आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
शरद पवारांनी 1991च्या निवडणुकीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याने एवढी अपरिपक्वता दाखवल्याचं दु:ख होतं, असंही ते म्हणाले.
राजकारणात आपलं कोण, परकं कोण हे पदोपदी लक्षात येतं. आपल्याबरोबर फिरणारा आपला नसतो ही स्थिती राजकारणात असते. आपल्या जवळच्या लोकांपासून सावध राहणंच योग्य, असं सूचक विधान त्यांनी केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2



















