देवेंद्र फडणवीस: ...तर एखाद्या काँग्रेस नेत्याला रॉकेटसोबत बांधून बालाकोटमध्ये पाठवलं असतं #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात:

1. काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला रॉकेटसोबत बांधून बालाकोटमध्ये पाठवलं असतं: फडणवीस

"बालाकोटमध्ये हल्ला झाला हे अमेरिका, रशिया, चीन मान्य करतं पण पाकिस्तान आणि काँग्रेस मात्र ते मान्य करत नाही. आधी माहिती असतं तर काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला रॉकेटसोबत बांधून बालाकोटमध्ये पाठवलं असतं," असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. याबाबतची बातमी ABP माझाने दिली आहे.

ते वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेत आर्वीमध्ये बोलत होते.

"पूर्वीचं सरकार दहशतवादी हल्ला झाल्यानंतर UNकडे जायचं आणि पाकिस्तानला रागवायला सांगायचं. ही बाब म्हणजे 'बाजूचा बंडू मला त्रास देतो, बाबा तुम्ही रागवा ना' असा हा प्रकार होता," असंही ते म्हणाले.

वर्धासह पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे.

2. हैद्राबाद सनरायझर्सचा पाच विकेटसने विजय

भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदाराबादने दिल्ली कॅपिटल्सववर विजय मिळवला.

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 129 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

जॉनी बेअरस्टोव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॉनी बेअरस्टोव

जॉनी बेअरस्टोवच्या रूपात हैदराबादला पहिला धक्का बसला. त्याने 28 चेंडूंत 9 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 48 धावा केल्या. त्याच्या एवढी धावसंख्या हैदराबादच्या एकाही फलंदाजाला करता आली नाही.

धावांचे आव्हान कमी असल्यामुळे हैदराबादला या सामन्यात विजय मिळवता आला. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

3. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 'मोठ्या काँग्रेस नेत्याचं नाव'?

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात झालेल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी ब्रिटिश दलाल ख्रिश्चियन मायकल याने काँग्रेसच्या बड्या नेत्याचं नाव घेतल्याचं सक्तवसुली संचालनालयाने (ED) म्हटलं आहे. याविषयीचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

सक्तवसुली संचालनालयाने आपल्या चार्जशीटमध्ये मायकलने लिहून ठेवलेल्या एका बजेटशीटच्या उल्लेख केला आहे. त्यात त्याने लोकांची तसंच संस्थांची नावं संक्षिप्त स्वरूपात लिहून ठेवली आहेत. त्यात 'AP' म्हणून ज्याचा उल्लेख आहे, तो काँग्रेसचा बडा नेता असल्याचं EDचं म्हणणं आहे.

ऑगस्टा

फोटो स्रोत, AFP

या बजेटशीट मध्ये 3 कोटी युरोंची लाच वायुदलाचे अधिकारी तसंच राजकीय नेते यापैकी कोणाकोणाला दिली याचे उल्लेख संक्षिप्त रूपात लिहून ठेवले आहेत.

4. प्रकाश आंबेडकरांविरोधात गुन्हा

निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचं वृत्त ABP माझाने दिलं.

यवतमाळच्या दिग्रसमध्ये बुधवारी झालेल्या झालेल्या जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले होते की, "पुलवामाच्या घटनेवर काहीही बोललं की निवडणूक आयोग बंदी घालतं. ही यंत्रणा भाजपच्या हातातलं बाहुलं आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, आम्ही यांनाही तुरुंगाची हवा खायला घालू."

त्यांच्याविरुद्ध दिग्रस पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश आंबेडकर

दुसरीकडे, हातकणंगले मतदारसंघात बोलताना राजू शेट्टींनी "सैन्यात आपली मुलं जातात. देशपांडे, कुलकर्णी यांची पोरं जात नाहीत," असं वक्तव्य केलं होतं.

हे जातीयवादी वक्तव्य असल्याचा आरोप करत ब्राह्मण जागृती सेवा संघानं त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याविषयीची बातमी News18 लोकमतच्या वेबसाईटने दिली आहे.

दरम्यान, 25 आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या आचासंहिता पथकांनी देशभरात 400 कोटींची रोकड जप्त केली आहे, तर तब्बल 708 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले गेलेत. तसंच 163 कोटी रुपयांची दारूही देशातल्या वेगवेगळ्या भागातून जप्त करण्यात आल्याचं News18 लोकमतने दुसऱ्या एका बातमीत म्हटलं आहे.

5. अभिनेत्री मयुरी कांगो गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड

'पापा कहते हैं' या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगो गुगल इंडियाची उद्योगप्रमुख झाली आहे. संबंधित वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

यापूर्वी मयुरीने परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रिक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर या पदाची धुरा सांभाळली होती. www.afaqs.com या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या नव्या व्यावसायिक वाटचालीविषयी माहिती दिली.

1996 साली प्रदर्शित झालेला 'पापा कहते हैं' हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटामध्ये मयुरीने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याकाळी तिचे असंख्य चाहते झाले होते. या चित्रपटातील 'घर से निकलते' ही या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली होती. मात्र इतकी लोकप्रियता मिळवूनही तिचा बॉलिवुडमध्ये म्हणावा तसा वावर दिसून आला नाही.

मयुरी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो आणि रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी आहे आणि ती औरंगाबाद शहरात लहानाची मोठी झाली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)