लोकसभा 2019: वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मैदानात #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:

फोटो स्रोत, Getty / BBC
1. केजरीवाल करणार वंचित बहुजन आघाडीचा प्रचार
महाराष्ट्रात लोकसभेच्या 15 जागा लढवण्यासाठी उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीला गेलेल्या नेत्यांना आम आदमीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'महाराष्ट्रात तुमची पुरेशी तयारी नाही, त्यामुळे लोकसभेची एकही जागा लढवू नका' असे स्पष्टपणे सांगत परत पाठवलं. त्यामुळे राज्यातील 'आप'च्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारास सुरुवात केली आहे, अशी बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका त्रयस्थ यंत्रणेकडून मतदारसंघाचं सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार राज्यात पक्ष संघटन कमकुवत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे केजरीवाल यांनी एकही जागा न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2014च्या निवडणुकीत आपने सर्व 48 जागा लढवल्या होत्या. त्यातील एकही जागेवर त्यांना विजय मिळवता आला नाही.
2. पाकिस्तान 100 मासेमारांची सुटका करणार
पाकिस्तानच्या उच्चायुक्ताला 385 मासेमार आणि 10 कैद्यांना सोडण्याची तोंडी सूचना दिल्यानंतर पाकिस्तानने 100 मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी द हिंदूने दिली आहे. दोन्ही देशाच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
7 एप्रिलला ही सुटका करणार असल्याचं पाकिस्तानने भारताला सांगितलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं हस्तांतरण होणार असल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे. सप्टेंबर 2010 मध्ये पाकिस्तानने 442 मासेमारांची सुटका केली होती.
3. काँग्रेसला मुस्लीम लीगच्या विषाणूची लागण - योगी आदित्यनाथ
मुस्लीम लीग ही विषाणूसारखी असून या विषाणूने काँग्रेसला ग्रासलं आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केली. त्यावर विरोधकांनी योगी हेच विषाणू आहेत, त्यामुळे या निवडणुकीत त्यांचंच निर्मूलन केलं जाईल, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्वीटमुळे हा शाब्दिक धुरळा उडाला आहे.
'मुस्लीम लीग म्हणजे विषाणू आहे. या विषाणूची ज्याला बाधा होईल, तो जिवंत राहू शकत नाही आणि सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला ही बाधा झाली आहे. ते जर जिंकले तर काय होईल याचा विचार करा. हा विषाणू सर्व देशभरात पसरेल," असं ते ट्वीटमध्ये लिहितात.
4. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात कुणाचंही नाव घेतलेलं नाही- ख्रिश्चियन मायकल
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचं नाव समोर आल्यानंतर तथाकथित मध्यस्थ ख्रिश्चियन मायकल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीत कुणाचंच नाव घेतलं नाही, असं सांगितलं आहे. NDTVने ही बातमी दिली आहे.
सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेले आरोपपत्र कोर्टात सादर होण्यापूर्वी आणि आरोपीला त्याची प्रत मिळण्यापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाल्याचा आरोपही त्यांनी लावला. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने प्रसारमाध्यमांकडे आरोपपत्र कसं लीक झालं, याबाबत तपाससंस्थांकडे अहवाल मागवला आहे.
5. भाजपविरोधात मतदान करण्याचं 600 कलाकारांचं आवाहन
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन 600 कलाकारांनी केलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांमध्ये नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकरांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. भाजपाविरोधात मतदान करून त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून पायउतार करा, असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कलाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केलं आहे. या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अनुराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















