पंजाबचा हैदराबादवर विजय; लोकेश राहुलची अर्धशतकी खेळी

के. एल. राहुल

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

वर्ल्डकपसाठी संघनिवड 15 एप्रिलला होणार आहे. वर्ल्डकप 50 षटकांचा आहे तर आयपीएल स्पर्धा 20 षटकांची. मात्र आयपीएलच्या माध्यमातून उत्तम फॉर्ममध्ये आहे हे दाखवण्याची संधी भारतीय खेळाडूंकडे आहे.

वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात स्थान पक्कं करण्यासाठी लोकेश राहुल उत्सुक आहे. सोमवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने 71 धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतलं राहुलचं हे तिसरं अर्धशतक आहे. या प्रदर्शनासह राहुलने वर्ल्डकपसाठी आपली दावेदारी ठामपणे मांडली आहे.

चेन्नईविरुद्धच्या लढतीत राहुलने अर्धशतकी खेळी साकारली होती. मात्र धावगतीचं आव्हान राखता न आल्याने पंजाबला तो सामना गमवावा लागला होता.

अनुभवी खेळाडू म्हणून राहुलला संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी राहुलला पेलता आली नाही, अशी टीका त्याच्यावर झाली होती. पुढच्याच सामन्यात राहुलने नाबाद संयमी खेळी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

डेव्हिड वॉर्नर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डेव्हिड वॉर्नर

मोहालीमध्ये झालेल्या लढतीत पंजाबच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर हैदराबादला दीडशे धावांचीच मजल मारता आली.

डेव्हिड वॉर्नरने 6 चौकार आणि एका षटकारासह 62 चेंडूत 70 धावांची खेळी केली. भरवशाच्या जॉनी बेअरस्टोला (1) झटपट बाद करत मुजीब उर रहमानने हैदराबादला दणका दिला.

मनीष पांडे (19), विजय शंकर (26), मोहम्मद नबी (12), दीपक हुडा (14) यांना मोठी खेळी करता आली नाही. पंजाबतर्फे मुजीब, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबने तिसऱ्याच षटकात ख्रिस गेलला गमावलं. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली.

मयांकने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांची खेळी केली. मयांक बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर (1), मनदीप सिंग (2) झटपट बाद झाल्याने पंजाबवरचं दडपण वाढलं.

मात्र राहुलने 7 चौकार आणि एका षटकारासह 71 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादकडून संदीप शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. राहुलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)