अमोल कोल्हे: उदयनराजे भोसले यांच्याविरोधात साताऱ्यातून लढण्यास सांगितलं म्हणून शिवसेना सोडली #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook / BBC
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :
1. उदयनराजेंविरोधात लढायला सांगितल्यामुळे शिवसेना सोडली - अमोल कोल्हे
सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांच्याविरुध्द निवडणूक लढण्यास शिवसेनेने सांगितलं होतं. त्यावेळी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी माझ्याकडून होणार नाही, असं सांगून मी शिवसेनेला रामराम ठोकला, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे. TV9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
"मी शिवसेनेत असताना मला सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात होता. मात्र छत्रपतींच्या गादीशी कधीच गद्दारी करणार नाही ही भावना मनात धरून बाहेर पडलो," असं अमोल कोल्हे म्हणाले.
कोल्हे सध्या राष्ट्रवादीकडून शिरूर लोकासभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील लढत आहेत
2. जेट कर्मचाऱ्याची आत्महत्या
मुंबईतल्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या जेट एअरवेजच्या एका वरीष्ठ तंत्रज्ञाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहं.

फोटो स्रोत, Getty Images
शैलेंद्र सिंह (45) हे कॅन्सरग्रस्त होते, शिवाय आर्थिक अडचणीत असल्याने ते तणावात होते. त्यांनी आर्थिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा दावा जेटच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं आहे.
जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानंतर कंपनीच्या एखाद्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचं हे पहिलं प्रकरण असल्याचं जेटच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. शैलेंद्र आणि त्यांचा मुलगा दोघेही जेटमध्ये कामाला होते, असंही या बातमीत म्हटलं आहे.
3) 'त्यांनी आम्हाला शिकवलं, की दहशतवादाल धर्म नसतो...'
भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 'माझ्या शापामुळेच हेमंत करकरे यांना मृत्यू आला', असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर 26/11च्या मुंबई हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या हेमंत करकरे यांची कन्या जुई नवरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत जुई नवरे यांनी सांगितलंय, "दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असं त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांच्या आयुष्यात आणि 24 वर्षांच्या पोलीस कारकिर्दीत त्यांनी प्रत्येकाला मदतच केली.
"मरणाच्या क्षणीही त्यांनी आपलं शहर, आपला देश वाचविण्याचाच प्रयत्न केला. आपल्या गणवेशावर त्यांचं प्रेम होतं आणि आमच्याहून अधिक त्यांनी वर्दीलाच महत्त्व दिलं. प्रत्येकानं या गोष्टीचं स्मरण ठेवावं, असं मला वाटतं.
"मला प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानांवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला त्यांना किंवा त्यांच्या विधानांना महत्त्वही द्यावंसं वाटत नाही. मी फक्त हेमंत करकरे यांच्याबद्दलच बोलू इच्छिते. ते रोल मॉडेल होते आणि त्यांचं नाव अभिमानानंच घेतलं पाहिजे," असं जुई या बातमीत म्हणाल्या आहेत.
26 नोव्हेंबर 2008च्या मुंबईवरील हल्ल्यात हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या महिनाभर आधी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख असताना त्यांनी 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी 11 आरोपींना अटक केली होती. त्यात एक आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरही होत्या.
4) दक्षिण भारतात आज फानी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागानं (IMD) येत्या काही तासांत हिंद महासागर आणि दक्षिणपूर्व बंगाल खाडीलगतच्या क्षेत्रांना फानी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ZEE 24 तासनं ही बातमी दिली आहे.
येत्या 12 तासांत चक्रीवादळ भीषण रूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली. मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासाठी, विभागानं तामिळनाडू, पाँडिचेरी समुद्र किनारे, कोमोरिन भाग, मन्नारची खाडी आणि केरळच्या समुद्रालगतच्या भागांना धोक्याचा इशारा दिला आहे.

पूर्व भूमध्यरेषेतील हिंद महासागर आणि त्याच्याशी निगडीत दक्षिणपूर्व बंगाल खाडीमध्ये दिसणारा दबाव उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकत असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.
5) 'लाव रे तो व्हिडीओ' ला भाजपकडून 'आता बघाच तो व्हिडीओ'ने उत्तर
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हीडीओ'ला भाजपने शनिवारी 'आता बघाच तो व्हिडीओ' म्हणत प्रत्युत्तर दिलंय. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात दोन स्क्रीन लावून आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर खुलासा केला आहे. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter / @ShelarAshish
"राज ठाकरेंनी त्यांच्या सभांतून 32 खोट्या प्रकरणात आरोप केले. हे आरोप RTIच्या माध्यमातून केले का? जे फुटेज घेतले ते भाजपच्या अधिकृत (सोशल मीडिया) अकाउंटवरून घेतले का? ज्या बातम्या दाखवल्या त्या पूर्ण दाखवल्या का?" असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी सभेत विचारले.
सर्व प्रकरणावर उत्तर आहेत मात्र वेळेअभावी 19 प्रकरणांची उत्तरं आज देणार आहोत, असं ते यावेळी म्हणाल्याचं या बातमीत म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















