मुंबई लोकसभा निवडणूक: उमेदवार आणि मतदारसंघ एका दृष्टिक्षेपात

मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसीसाठी, मुंबईहून
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मुंबईमध्ये 29 एप्रिलला चौथ्या टप्यातलं मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यात 17 मतदारसंघात मतदान होणार आहे.

मुंबईमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या सहा मतदारसंघासह ठाणे आणि कल्याण या मतदारसंघात मतदान होणार आहे.

2014च्या निवडणुकीत ५१.५९% मतदान झालं होतं. यंदाची काय परिस्थिती आहे याकडे लक्ष लागलंय. मुंबईच्या मतदारसंघाच्या परिस्थितीचा हा आढावा.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

दक्षिण मुंबईमध्ये प्रमुख लढत ही शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि कॉंग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यामध्ये होतेय.

हा मतदारसंघावर कुठल्याही एका पक्षाला वर्चस्व टिकवता आलं नाही. १९९६ ते २००४ पर्यंत कॉंग्रेसचे मुरली देवरा आणि भाजपच्या जयंतीबेन मेहता यांच्यात काटेकी टक्कर होती.

२००४ ला मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली. २००४ ते २०१४ पर्यंत मिलिंद देवरा या मतदारसंघात खासदार होते. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार ३,७४,६०९ मतांनी दक्षिण मुंबईचे खासदार म्हणून निवडून आले. तर मिलिंद देवरा यांना २,४६,०४५ मतं मिळाली होती.

अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फाईल फोटो

या मतदारसंघात व्यवसायिक, छोटे व्यापाऱ्यांचे प्रश्न, गिरगावातील जुन्या चाळींचा पुर्नविकास, मच्छिमारांचे प्रश्न या प्रमुख मुद्यांवर भर देण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्यामुळे हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला.

२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ५२.४९% मतदान झालं होतं.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि कॉंग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात प्रमुख लढत आहे.

२००४ पासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड या मतदारसंघातून खासदार होते. २०१४ ला शिवसेनेकडून पहील्यांदाचं लोकसभेसाठी राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली. २०१४ ला शिवसेनेचे राहुल शेवाळे ३,८०,७४७ मतं घेऊन निवडून आले. कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड हे २,४२,७०१ मतं मिळवून दुसर्‍या क्रमांकावर राहीले. मतदारांनी या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ९५७१ इतकी मतं 'नोटा'ला दिली.

शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे

धारावीचा पुर्नविकास, छोट्या व्यापार्यांच्या अडचणी, माहुलवासियांचा प्रदुषण प्रश्न, देवनार डंपिंग ग्राऊंड, बीडीडी चाळींचा विकास आराखडा, रेल्वे स्थानकं आणि बाहेरची वाढती गर्दी, कोळीवाड्यांचा विकास आणि इतर नागरी समस्या हे या मतदारसंघातले प्रमुख आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ५३.९ % मतदान झालं होतं.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

ईशान्य मुंबईत भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.

२००४ ते २०१४ या मतदारसंघावर आघाडीचं वर्चस्व होतं. २००४ साली कॉंग्रेसचे गुरूदास कामत तर २००९ साली राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील या मतदारसंघातून खासदार झाले होते. २०१४ ला भाजपचे किरीट सोमय्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या यांना ५,२५,२८५ मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना २,०८,१६३ मतं मिळाली होती. आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांना ७६४५१ मतं मिळाली होती.

भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील

फोटो स्रोत, Getty Images/Facebook

फोटो कॅप्शन, भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील

उपनगरीय रेल्वे प्रवाश्यांच्या समस्या, डंपिंग ग्राऊंड, म्हाडा पुर्नविकास वनजमीनवरची अतिक्रमणं हे प्रमुख प्रश्न आहेत.

२०१४ ला या मतदारसंघात ५१.७ % मतदान झालं होतं. शिवसेनेच्या दबावामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करून भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली यामुळे हा मतदारसंघ अधिक चर्चेत होता.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसं

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आणि कॉंग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे.

या मतदारसंघात माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक हे पाच वेळा निवडून आले होते. २००४ ला कॉंग्रेसने अभिनेता गोविंदाला उमेदवारी दिली आणि गोविंदा मोठ्या मताधिक्याने निवडून आला.

त्यानंतर २००९ ला कॉंग्रेसचे संजय निरुपम हे निवडून आले. तर २०१४ ला हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे गेला. २०१४ ला भाजपचे गोपाळ शेट्टी हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. २०१९ ला कॉंग्रेसने पुन्हा सेलिब्रिटी पॅटर्न आणतं उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली.

गोपाळ शेट्टी आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

फोटो स्रोत, FACEBOOK/GETTY IMAGES

२०१४ ला भाजपच्या गोपाळ शेट्टी यांना ६,६४,००४ मतं मिळाली होती तर कॉंग्रेसच्या संजय निरुपम यांना २,१७,४२२ मतं मिळाली होती.

या मतदारसंघात उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या, अनधिकृत बांधकामं, झोपडपट्टी पुनर्विकास आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न या मतदारसंघात आहेत.

२००४ नंतर कॉंग्रेसने पुन्हा कॉंग्रेसने सेलिब्रिटी कार्ड काढतं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ चर्चेत आहे. २०१४ ला या मतदारसंघात ५३.७ % मतदान झालं होतं.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ

या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आणि कॉंग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यात प्रमुख लढत आहे.

कुठल्याही पक्षाशी बांधील नसलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाने कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाई, भाकप या सर्व पक्षांना संधी दिली आहे. २०१४ ला भाजपच्या पूनम महाजन यांनी खासदार प्रिया दत्त यांना मोठ्या मताधिक्याने मागे टाकलं.

या मतदारसंघात दोन विमानतळांना झोपडपट्ट्यांनी घातलेला विळखा, मीठी नदीचं रूंदीकरण, वांद्रे आणि लोकमान्य टिळक टर्मिनससह इतर स्थानकांची बिकट परिस्थिती हे इकडचे प्रमुख मुद्दे आहेत.

पूनम महाजन आणि कॉंग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त

फोटो स्रोत, Facebook

२०१४ साली भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना ४,७८, ५३५ मतं मिळाली. तर माजी खासदार प्रिया दत्त यांना २, ९१,७६४ इतकी मतं मिळाली. २०१४ साली या मतदारसंघात ५३.०९ इतकं मतदान झालं होतं.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यात प्रमुख लढत आहे.

या मतदारसंघातून अभिनेते सुनिल दत्त हे १८ वर्षे खासदार होते. २००५ साली सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर प्रिया दत्त या मतदारसंघातून निवडून आल्या. २००९ साली ही या मतदारसंघातून गुरूदास कामत निवडून खासदार झाले. पण २०१४ ला शिवसेनेचे गजानन किर्तीकर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

२०१४ ला शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांना ४,६४,८०२ मतं मिळाली. कॉंग्रेसच्या गुरूदास कामत यांना २,८१,७९२ इतकी मतं मिळाली.

गजानन किर्तीकर आणि संजय निरुपम

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, संजय निरुपम आणि गजानन कीर्तीकर

या मतदारसंघात नागरी सुविधा, गोरेगाव फिल्मसिटीचा विकास आराखडा, वाहतुकीचे प्रश्न, एसआरए, संजय गांधी उद्यान, कोस्टल रोड हे इकडचे प्रमुख मुद्दे आहेत.

या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेसचे संजय निरुपम यांना मुंबई कॉंग्रेसचं पद सोडावं लागलं होतं. या मतदारसंघातून उमेदवारी किंवा मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. संजय निरुपम यांच्या उचलबांगडीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला.

२०१४ साली उत्तर पश्चिम मतदारसंघात ५०.५७ % मतदान झालं होतं.

ठाणे लोकसभा मतदारसंघ

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात प्रमुख लढत आहे.

हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. वर्षानुवर्षे ठाण्यात शिवसेनेच्या उमेदवाराला लोकांनी निवडून दिलंय. २० वर्षे शिवसेनेचे प्रकाश परांजपे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूकीत आनंद परांजपे हे निवडून आले. २००९ साली शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादीचे संजीव नाईक या मतदारसंघातून निवडून आले. अनेक वर्षांनंतर २००९ ला शिवसेनेव्यतिरिक्त दुसरा उमेदवार निवडून आला. त्यानंतर २०१४ ला शिवसेनेने राजन विचारेंना उमेदवारी दिली.

मुंबई

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, राजन विचारे आणि आनंद परांजपे

२०१४ ला शिवसेनेच्या राजन विचारे हे ५,९५, ३६४ मताधिक्यांनी निवडून आले. तर दुसर्‍या क्रमांकावर राहीलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांना ३,१४,०६५ मतं मिळाली.

ठाण्यातली अनधिकृत बांधकामं, वाहतुकीची समस्या, मध्य आणि ट्रान्स हार्बरला जोडणारी लोकलसेवा ठाण्यात आहे. रेल्वेच्या समस्या, वाढती गर्दी, पुर्नविकास हे इकडचे प्रमुख मुद्दे आहेत.

या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ५०.८७ % मतदान झालं होतं.

कल्याण लोकसभा संघ

शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळाराम पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा ठाण्याप्रमाणेच शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ ला आनंद परांजपे शिवसेनेकडून खासदार झाले. २०१४ ला आनंद परांजपे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उभे राहिले.

या लढतीत श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. श्रीकांत शिंदे हे ४ लाख ४० हजार मतांनी निवडून आले तर राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना १ लाख ९० हजार मतं मिळाली होती. २००९ साली आनंद परांजपे हे शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले ते २०१४ ला राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढले आणि त्यांचा पराभव झाला.

श्रीकांत शिंदे

फोटो स्रोत, Facebook

कल्याण परिसरातून रेल्वेला जवळपास ४०० कोटींचा महसूल मिळतो. तितक्या सुविधा प्रवाशांना दिल्या जात नाहीत, मुंब्रा समांतर रस्ता, कल्याण टर्मिनस, वाहतूकीची समस्या हे इकडचे प्रमुख प्रश्न आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ४२.९४ इतकं मतदान झालं होतं.

२९ एप्रिल सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. मुंबईमध्ये ३३,३३४ इतकी मतदान केंद्र आहेत. ८००० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन निवडून आयोगाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप शिंदे यांनी केलंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)