रसेलची हार्दिकवर सरशी; कोलकाताने मुंबईला नमवलं तर दिल्ली प्ले ऑफमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल आणि मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्या यांच्यात रंगलेल्या फटकेबाजीच्या जुगलबंदीत रसेलने बाजी मारली. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला 34 धावांनी नमवले.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 232 धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिलने 45 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली.
ख्रिस लिनने 29 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामात भन्नाट फॉर्मात असणाऱ्या रसेलने 40 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 80 धावांची धुवांधार खेळी केली. कर्णधार दिनेश कार्तिकने 7 चेंडूत 15 धावा केल्या.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईची अवस्था 4 बाद 58 अशी झाली. एका बाजूने सातत्याने विकेट्स पडत असताना हार्दिक पंड्याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांसह 91 धावांची वेगवान खेळी केली.
हार्दिकने एकहाती मॅच जिंकून देण्यासाठी प्रयत्न केले, मात्र दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने ते अपुरेच ठरले. मुंबईने 198 धावांची मजल मारली.
हा कोलकाताचा शंभरावा विजय ठरला. मुंबई इंडियन्सला प्ले ऑफसाठी पात्र ठरण्यासाठी आणखी थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोलकातातर्फे सुनील नरिन, हॅरी गुर्ने, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
अष्टपैलू खेळ करणाऱ्या रसेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
बेंगळुरूला नमवत दिल्ली प्लेऑफमध्ये
शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर दिल्लीने तब्बल सात वर्षांनंतर आयपीएल स्पर्धेत प्लेऑफसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. दिल्लीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 16 धावांनी हरवलं.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा केल्या. धवनने 37 चेंडूत 50 तर श्रेयसने 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली. शेरफेन रुदरफोर्डने 13 चेंडूत 28 तर अक्षर पटेलने 9 चेंडूत 16 धावांची खेळी केली.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 171 धावा करता आल्या. पार्थिव पटेलने 39 तर मार्कस स्टोनिअसने 32 धावा केल्या. दिल्लीकडून कागिसो रबाडा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
धवनला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















