रफाल प्रकरण: अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचा दावा - UPA काळात 1 लाख कोटींची कंत्राटं मिळाली #5मोठ्याबातम्या

अनिल अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनिल अंबानी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:

1. UPAच्या काळात रिलायन्सला 1 लाख कोटींची कंत्राटं?

संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारच्या कार्यकाळात सरकारच्या 2004-2014 या काळात आम्हाला 1 लाख कोटी रुपयांची कंत्राटं मिळाली, असा दावा रिलायन्स समूहाने केला आहे.

ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER/@reliancegroup

रफाल विमानांच्या सौद्यामध्ये अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपये मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केल्याचा राहुल गांधी यांनी वारंवार आरोप केला आहे.

अनिल अंबानी यांना 'क्रोनी कॅपिटलिस्ट' म्हणणाऱ्या राहुल गांधी यांचे सर्व आरोप रिलायन्सने फेटाळले आहेत. "गांधी यांची विधानं "खोटी, चुकीच्या माहितीवर आधारीत, विकृत, दुर्भावनायुक्त आहेत," असं रिलायन्स समूहाने म्हटल्याचं सविस्तर वृत्त स्क्रोल वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे.

2. मोदींचा कार्यकाळ विनाशकारी- डॉ. मनमोहन सिंह

देशातील तरुण, शेतकरी, व्यापारी आणि प्रत्येक घटनात्मक संस्थांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ क्लेशदायक आणि विनाशकारी होता. त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह रविवारी म्हणाले.

लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत डॉ. सिंह यांनी मोदी लाट असल्याचा दावाही फेटाळून लावला.

मोदी यांचे पाकिस्तानबाबतच्या धोरणाचे वर्णन डॉ. सिंह यांनी गचाळ असे केले. देश आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असून मोदी सरकारमुळे देशाच्या अर्थव्यवस्था गंभीर झाल्याचे सिंह यांनी सांगितलं.

ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER/@arunjaitley

डॉ. सिंह यांच्या वक्तव्यांवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी टीका केली आहे. जेव्हा अर्थतज्ज्ञाचा राजकारणी होतो, तेव्हा तो अर्थव्यवस्था आणि राजकारण दोन्हीचे भान गमावून बसतो, असं ट्वीट जेटली यांनी केलं आहे.

धोरणलकवा आणि भ्रष्टाचार ही डॉ. सिंह यांच्या कार्यकाळाने दिलेली देणगी आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे. जेटली यांनी दिलेल्या प्रत्युत्तराचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

3. रेल्वे उशिरा पोहोचल्याने 400 विद्यार्थ्यांची चुकली परीक्षा

कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यातील सुमारे 400 विद्यार्थ्यांना ट्रेन उशिरा पोहोचल्याने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET)ला मुकावं लागलं.

म्हैसूरमार्गे हंपी ते बंगळुरू अशी चालवली जाणारी हंपी एक्स्प्रेस रविवारी सकाळी 7 वाजता बंगळुरूत पोहोचणे आवश्यक होते. द न्यूज मिनिट या वेबसाइटने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी 2 वाजता होती, मात्र ट्रेनला 7 तासांपेक्षा जास्त उशीर झाला आणि दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी ही ट्रेन बंगळुरूला पोहोचली. या घटनेमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी ट्वीट करून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या.

सिद्धरामय्या

फोटो स्रोत, TWITTER/@siddaramaiah

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे एक ट्वीटही केले आहे. "तुम्ही तुमच्या यशाबाबत स्वतःची पाठ थोपटून घेता, मग सहकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेची जबाबदारी घेणार का?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

4. आनंदराज आंबेडकर यांच्या काँग्रेसप्रवेशाची अफवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या रविवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. आंबेडकर यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

मात्र हे वृत्त चुकीचं आणि खोटं असल्याचं रिपब्लिकन सेनेतर्फे स्पष्ट करण्यात आलें.

आनंदराज आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आनंदराज आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत असल्यामुळेच असा प्रकार करण्यात आला असावा. त्याकडे जनतेने लक्ष देऊ नये, असं आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केल्याचं वृत्त लोकमतने प्रसिद्ध केलं आहे.

5. विमान उड्डाणांमध्ये कपात, विमानप्रवास महागला

जेट एअरवेज आणि इंडिगो या प्रमुख खासगी विमान कंपन्यांनी दैनंदिन उड्डाणांमध्ये कपात केल्यामुळे देशांतर्गत विमानप्रवास महागला आहे. या कंपन्याच्या उड्डाणांमध्ये कपात झाल्यामुळे इतर कंपन्यांवर ताण येत आहे. त्यामुळे विमान तिकिटांच्या भाड्यामध्ये तब्बल 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

आर्थिक गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजने दररोज 100 उड्डाणं रद्द केली. वैमानिकांची संख्या पुरेशी नसल्यामुळे इंडिगोने रोजची 50 उड्डाणे रद्द केली आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)