काश्मीरमधल्या जासिया अख्तरने रचला इतिहास, महिला T-20 स्पर्धेत पटकावलं स्थान

फोटो स्रोत, BBC/Kamran Yousuf
- Author, ताहीर हुसैन सौफी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
दक्षिण काश्मीरमधल्या क्रिकेटवेड्या जासियाने आपल्या दुःखांवर मात करून इतिहास घडवला आहे. काश्मिरी मुस्लीम मुलीची प्रतिमा झुगारून देत क्रिकेटचं नवं क्षितीज गाठणाऱ्या जासियाची ही प्रेरणादायी कहाणी.
सचिन तेंडुलकरची फॅन असलेल्या दक्षिण काश्मीरमध्ये राहणाऱ्या 28 वर्षांच्या जासिया अख्तरने नवा इतिहास रचला आहे.
भारतात सुरू झालेल्या महिला मिनी आयपीएल स्पर्धेत तिने स्थान मिळवलंय. देशात महिला क्रिकेटला लोकप्रियता मिळावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या स्पर्धेचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. महिला मिनी आयपीएलला 'वुमेन T-20 चॅलेंज' हे नाव देण्यात आलं आहे. महिला क्रिकेट खेळणारी ती पहिली काश्मिरी मुलगी आहे.
जासियाने 2013 साली काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या ब्रारियार गावातल्या तिच्या घरापासून 460 किमी दूर एका स्पर्धेत द्विशतक झळकावलं आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवल्यानंतर तिने पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून खेळायला सुरुवात केली. मात्र, तिचा हा प्रवास सोपा नव्हता.
जासियाने दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते, "पंजाबकडून खेळण्याच्या माझ्या निर्णयामागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये सुविधांचा अभाव आहे. दुसरं म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी मला शोपियानहून फारच लांब श्रीनगरला जावं लागायचं. शिवाय पंजाब क्रिकेट असोसिएशन एका मोसमात चार कॅम्प आयोजित करत असल्याचं मी ऐकलं होतं. त्यामुळे एकदा तरी प्रयत्न करायला हवा, असं मला वाटलं."
2010 साली काश्मिरात हिंसाचार उफाळला होता. त्यावेळी पुढच्या नऊ वर्षांनंतर नशीब तिला कुठे घेऊन जाईल, याची कसलीच कल्पना तिला नव्हती. मात्र, त्या कठीण काळातही ती यू-ट्यूबवरून क्रिकेटचे बारकावे शिकत राहिली. अखेर क्रिकेटसाठी तिने आपलं गावं, आपलं राज्य सोडलं. मात्र, हा पुढचा प्रवासही खडतर होता.

फोटो स्रोत, BBC/Kamran Yousuf
सतत आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या जासियाला सुरुवातीला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. मात्र, क्रिकेटसाठी कठोर मेहनत घेत असलेल्या जासियाला नशिबाचीही साथ मिळाली.
घरातली सगळी कामं करणाऱ्या जासियाने क्रिकेटच्या सरावात कसूर ठेवली नाही.
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये तिने मिळवलेलं यश क्रिकेटप्रती तिच्या प्रेमाची, तिच्या समर्पणाची साक्ष देत होते.
पुरूषांची मक्तेदारी असलेल्या या खेळात जासियाला बराच संघर्ष करावा लागला. मात्र, तिच्या या कठीण काळानेच तिला एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून घडवलं.
जयपूरमध्ये होत असलेल्या वुमेन T-20 चॅलेंजमध्ये खेळणारी काश्मीरमधली ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
वुमेन T-20 चॅलेंजमध्ये खेळणं, तिच्यासाठी मोठं यश आहे. जयपूरमध्ये 6 ते 11 एप्रिलदरम्यान ही स्पर्धा खेळली जातेय. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या महिला क्रिकेटपटूही सहभागी झाल्या आहेत. शिवाय भारतीय महिला क्रिकेटमधल्या हरमनप्रीत आणि मिताली राज यांच्यासारख्या स्टार क्रिकेटपटूही आहेत.
जासिया म्हणते, "काश्मीरमधून मी पहिली महिला खेळाडू आहे, याची मला जाणीव आहे. मात्र, आरक्षण आणि प्रतिभेची पारख खोऱ्यातल्या क्रिकेटपटूंसाठी मोलाची मदत ठरू शकते."
ट्रायल ब्लेझर टीममध्ये जासियाची निवड झाल आहे. स्मृती मंधाना टीमची कॅप्टन आहे. तर व्हेलॉसिटी टीमचं नेतृत्व मिताली राज आणि सुपरनोव्हाज टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहेत.

फोटो स्रोत, BBC/Kamran Yousuf
"जिथे मी कमी पडते, ती बाजू सुधारण्यावर माझा भर असेल. विंडिजच्या स्टॅफनी टेलरसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार क्रिकेटपटूंसोबत खेळणं, फारच रोमहर्षक आहे," असं जासिया सांगते.
पंजाबकडून खेळताना जासिया हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळली आहे आणि तीच जासियाची प्रेरणास्थानही आहे.
24 एप्रिल रोजी जासियाला बीसीसीआयकडून कॉल आला आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये निवड झाल्याचं तिला समजलं. जासियाचा तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही.
"खरं सांगायचं तर मला वाटलं कुणीतरी गम्मत करतंय. मात्र, सुदैवाने त्यावेळी माझं इंटरनेट सुरू होतं आणि त्यावर मी माझं नाव शोधलं," जासिया सांगत होती.
तिच्या या निवडीमुळे शेतकरी असलेले तिचे वडील गुलाम मोहम्मद वणी यांनादेखील आनंद झाला आहे. ते म्हणाले, "मला तिचा अभिमान वाटतो. आमच्या गावालाही तिचा अभिमान आहे. तिने क्रिकेटसाठी जी मेहनत घेतली त्यामुळे तिच्या चार लहान भावंडांनाही परिश्रम घेण्याची प्रेरणा मिळाली."
पाच भावंडांमध्ये सर्वांत मोठी असलेल्या जासियाने नेहमीच एका तत्वाचं पालन केलं आहे : कुठल्याही परिस्थितीसमोर हार मानायची नाही.
क्रिकेट विश्वातल्या महिलांसाठी काश्मीरमधली जासिया पोस्टर गर्ल ठरतेय.
(ताहीर हुसैन सौफी काश्मीरमधले पत्रकार आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















