नरेंद्र मोदी: अतिरेकी मारायलाही निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल का? #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी, भाजप

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:

1.अतिरेकी मारण्यासाठी निवडणूक आयोगाला विचारायचं का?- नरेंद्र मोदी

दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आता निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची की काय, असा उपरोधिक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

काश्मीरमधील शोपियान येथे रविवारी सकाळी लष्कराशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, "देशाच्या काही भागांत लोकसभा निवडणुकांसाठी सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना दहशतवाद्यांना आमच्या सरकारने मारले म्हणून काही लोक चिंताग्रस्त आहेत. जेव्हा सशस्त्र दहशतवादी हल्ला करतात तेव्हा त्यांना मारण्याच्या परवानगीसाठी लष्करी जवानांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जायला हवं की काय?"

देशात निवडणुका सुरू असताना सुरक्षा जवान दहशतवाद्यांवर गोळीबार करतात, अशी धक्कादायक विधानं विरोधक कसे करू शकतात, असा सवालही त्यांनी विचारला.

2. सत्तेत आल्यास कलम 370 हटविणार- अमित शहा

"नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यास काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटविण्यात येईल," असं आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी दिलं. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

"जम्मू आणि काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हवा, अशी मागणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केली आहे. तर काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात 'AFSPA' कायद्याचा फेरआढावा घेऊन देशद्रोहाच्या तरतुदीत दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं आहे.

"मात्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास कलम 370 निश्चितपणे हटविण्यात येईल," असं शहा पुढे म्हणाले.

3. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अन्नधान्य भाववाढीचा धोका

पश्चिम आणि दक्षिण भारतातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि असाधारण उष्म्यामुळे शेतमालाच्या किमती वाढलेल्या आहेत. या वाढीव किमतीचं नियंत्रण हे नव्या सरकारसमोरील एक मोठं आव्हान राहील, अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

कडधान्यं आणि भाज्यांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याचं चित्र बाजारात आहे. जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तरी या पावसाचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल याबाबचत तज्ज्ञांना प्रश्न पडला आहे.

पाणी

दरम्यान दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करून 21 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पालक सचिवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

4. फणी वादळात मृतांची संख्या 64 वर

नऊ दिवसांपूर्वी ओडिशात आलेल्या फणी वादळात मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे. रविवारी आणखी 21 मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. NDTV ने ही बातमी दिली आहे.

शनिवारपर्यंत मृतांचा आकडा 43 होता. शनिवारी आणखी 18 लोकांचा पुरी भागात आणि खुर्डा जिल्ह्यात मृत्यू झाला. या परिसराला वादळाला सर्वाधिक तडाखा बसला होता.

पुरी भागातच 39 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.

5. इरोम शर्मिला यांनी दिला जुळ्यांना जन्म

मणिपूरमध्ये लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या AFSPAच्या विरोधात 16 वर्षं उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला यांनी जुळ्या बालकांना जन्म दिला आहे. योगायोगाने मातृदिनीच त्यांनी दोन मुलींना जन्म दिल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. निक्स सखी आणि ऑटमन तारा अशी या मुलींची नावं ठेवली आहेत.

इरोम शर्मिला

ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी उपोषण सोडलं होतं. त्यानंतर काही काळ त्या कोडाईकनालला होत्या. गर्भधारणेनंतर त्या बंगळुरूला राहत होत्या.

"हे माझ्यासाठी नवीन आयुष्य आणि नवी सुरुवात आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)