काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात अटक वॉरंट : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंविरोधात अटक वॉरंट
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. शासकीय कामात अडथळा आणण्या प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हे प्रकरण 2018 मधील आहे. 2 जानेवारी 2018 रोजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय उपचारासंदर्भात झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांना घेराव घातला होता.
याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2. काँग्रेसनं राष्ट्रवादाची साथ सोडावी- प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ शकतो. त्यामुळे आमचा राष्ट्रवादीला विरोध आहे. राष्ट्रवादीसोबत असल्यास महाआघाडीत जाणार नाही, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आम्ही काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं, तर काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ सोडावी लागेल. राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. वेळ पडल्यास ते कधीही भाजपबरोबर जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत चर्चा करताना राष्ट्रवादीला गृहीत धरलं नाहीये, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
एमआयएम सोबत कोणताही वाद नसल्याचं सांगून त्यांनी विधानसभा निवडणूक आम्ही एकत्रच लढवणार असल्याचंही सांगितलं. पुढील भूमिका 31 ऑगस्टला जाहीर करू, असंही आंबेडकरांनी म्हटलं.
3. शिवसेनेच्या वाटाघाटी बेस्ट कृती समितीला अमान्य, उपोषण सुरूच
शिवसेनेनं केलेल्या वाटाघाटी मान्य नसल्याचं सांगत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
बेस्ट कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर ऑक्टोबरमध्ये पगार देण्याचा तसंच महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, कामगार सेनेचे नेते सुहास सामंत, अनिल पाटणकर आणि अॅड. अनिल परब यांची बुधवारी 'मातोश्री'वर बैठक झाली.
4. केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (28 ऑगस्ट) पार पडलेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत देशभरात 75 नव्या मेडिकल कॉलेजना मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

या बैठकीमध्ये कोळसा खाण क्षेत्र, छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये 100 टक्के तर डिजिटल मीडिया क्षेत्रात 26 टक्के FDI ला मान्यता देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी अनुदान देण्यात आल्याची घोषणाही जावडेकर यांनी केली.
5. काँग्रेस नेते अहमद पटेलांच्या मुलाविरोधातही ईडीची नोटीस
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैसल याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं नोटीस बजावली आहे. फैसल यांना स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. झी न्यूजनं ही बातमी दिली आहे.
ईडीनं फैसल यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं आहे. स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात ईडीनं आतापर्यंत केलेल्या कारवाईत हजारो कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीये.
स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातमधील एक फार्मा कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेमधील घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय.
ईडीनं याप्रकरणी गेल्या महिन्यात अहमद पटेलांचे जावई इरफान सिद्दीकी यांचीही चौकशी केली होती. अहमद पटेल हे काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधीचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















