कोरोना व्हायरस: तुमची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवाल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोरोना व्हायरसमुळे जगभरात साडेसहा हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूवर अद्याप औषध सापडलेलं नाही. पण कोरोनाची लागण झाल्यावर मृत्यू होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे.
काही लोक कोरोना विषाणूविरोधात यशस्वीपणे लढा देऊ शकत आहेत तर काही जणांचा या रोगाने बळी घेतला आहे. हे नेमकं कशामुळे होतं. तर याला आपली रोगप्रतिकारक क्षमता कारणीभूत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कोरोना व्हायरसमुळे जो आजार होतो, त्याचं नाव आहे कोव्हिड-19. या आजारावर अजूनही औषध सापडलं नाहीये. त्यामुळे आतापर्यंत जगात सुमारे साडे 6 हजार लोक मरण पावलेत. पण त्याच वेळी दररोज हजारो लोक बरे होऊन दवाखान्यातून बाहेरही पडत आहेत.
औषधाशिवाय लोक बरे कसे होताहेत?
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर मृत्यूचं प्रमाण साधारण 3 टक्के आहे. म्हणजे 100 जणांना कोरोनाची लागण झाली तर 3 जणांचा जीव जातो, पण 97 माणसं बरी होऊन घरी जातात.

ही सुमारे 97 टक्के माणसं बरी होतात ती त्यांच्या अंगात असलेल्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे. ही क्षमता काय असते आणि ती वाढवता येते का, हे आता पाहूया.
जेव्हा आपल्या शरीरावर सूक्ष्मजीव हल्ला करतात, तेव्हा आपण आजारी पडतो. हे हल्ले आपल्यावर सतत होत असतात. या हल्ल्यांना रोखण्यासाठी आपल्या शरीराने एक यंत्रणा तयार केली आहे. त्यालाच रोगप्रतिकारक क्षमता म्हणतात. इंग्रजीत याला इम्युनिटी असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
ही यंत्रणा सशक्त असेल तर आपण हल्ला झाला तरी आजारी पडत नाही. पण ही यंत्रणा कमकुवत असेल किंवा हल्ला करणारा सूक्ष्मजीव सशक्त असेल तर आपण आजारी पडतो.
आजारी पडल्यावरही प्रत्येक वेळी औषधाची गरज नसते. कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती या आजारांशी लढाई करत असते. त्यामुळे नेहमीचं व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर आपल्याला आधी ताप येतो, सर्दी होते. पण औषध नाही घेतलं तरी काही दिवसांत आपण बरे होऊ शकतो. पण कोरोनाची गोष्ट वेगळी आहे.
कोरोना व्हायरसपासून कसं संरक्षण होतं?
आपली रोगप्रतिकारक यंत्रणा कशी काम करते याची माहिती बीबीसीच्या बाईटसाइज या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यानुसार, तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे तुमच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी. त्याला इंग्रजीत WBC किंवा व्हाईट ब्लड कॉर्पसल्स असं म्हणतात. हे आपल्या शरीरात पोलिसांप्रमाणे काम करतात.
आपल्याला आजार होऊ नये म्हणून या पेशी अहोरात्र झटत असतात. आपण झोपतो तेव्हाही या पेशी काम करतच राहतात. आपल्या शरीरात अब्जावधी पांढऱ्या पेशी असतात. रोज साधारणतः 100 अब्ज पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात तयार होत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या शरीरात ज्यावेळी एखादा सूक्ष्मजीव घुसतो. उदाहरणार्थ तुमच्याजवळ कोरोनाचा पेशंट शिंकला. तर तो व्हायरस तुमच्या नाकातून तुमच्या शरीरात शिरेल.
शरीरातल्या पांढऱ्या पेशींना असा संदेश मिळतो की आपल्या प्रणालीत शत्रू आला आहे. या शत्रूच्या पाठीवर असलेल्या प्रथिनांवर पांढऱ्या पेशींना कळतं हा शत्रू आहे की नाही.

फोटो स्रोत, Getty Images
शत्रू शिरल्याची खात्री झाली तर पांढऱ्या पेशी ताबडतोब विशिष्ट अँटिबॉडिज तयार करतात, त्या विशिष्ट सूक्ष्मजीवाशी लढतात. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागतात. म्हणून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं.
पण कोरोना व्हायरस आपल्या शरीरासाठी नवा आहे. हा व्हायरस 'झूनॉटिक' आहे. म्हणजे तो प्राण्यांच्या शरीरातून माणसांमध्ये येणारा आहे.
त्यामुळे आपली यंत्रणा या नव्या व्हायरसला पटकन ओळखायला, त्याच्याशी दोन हात करायला पूर्णतः सज्ज नाहीये. ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे, ते या व्हायरसशी लढा देऊ शकतात.
कोव्हिड-19 हा अत्यंत नवा व्हायरस असल्यामुळे त्याचं स्वरूप ओळखण्यास यंत्रणा कमी पडल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
"कोव्हिड-19 या व्हायरसचा पृष्ठभाग, रचना ही वेगळी आहे. या व्हायरसने आपलं रुप बदलल्यामुळे रोगप्रतिकारक प्रणालीच्या लक्षात येत नाही की हा परकीय शत्रू आहे," असं मत परभणी येथील डी. एस. एम. कॉलेजचे सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शिवा आयथॉल सांगतात.
पुढे ते सांगतात, "काही लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते तर काही लोकांमध्ये कमी असते त्याची बरीच कारणे असतात. अनुवांशिकता, आहार, जीवनशैली, वय इत्यादी गोष्टींचा प्रभाव आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर पडतो."

फोटो स्रोत, Getty Images
रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढते?
कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर प्रतिकार शक्ती सुधारण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.
रोगप्रतिकारक क्षमता नैसर्गिकरीत्या वाढवण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाने काही मार्गदर्शक तत्त्वं दिली आहेत. त्यापैकी बहुतांश तुम्हाला माहीत असतील पण आता ती फक्त माहितीतच ठेवू नका तर त्यावर काम करा.

फोटो स्रोत, Getty Images
आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश अधिक असल्यास तसेच व्यायाम, फिरायला जाणं या गोष्टी नियमित केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
संतुलित आहार, पुरेशी झोप घेतल्यास आरोग्य चांगलं राहतं. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ताण-तणाव घेऊ नका असा सल्ला हहार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयाने दिला आहे.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















