कोरोना व्हायरस : गृहसचिवांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबीयांचं पर्यटन, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश - #5मोठ्याबातम्या

@AnilDeshmukhNCP

फोटो स्रोत, @AnilDeshmukhNCP

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत

1) कोरोना व्हायरस : गृहसचिवांचं पत्र घेऊन वाधवा कुटुंबीयांचं पर्यटन

कोरोना व्हायरसमुळं महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन असताना, उद्योगपती वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरमध्ये फिरताना सापडले. वाधवान कुटुंबीयांकडे गृह मंत्रालयाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र असल्यानं त्यांना कुणीच अडवलं नसल्याचं समोर आलंय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं

ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.

राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश एकूण प्रकरणं संपूर्ण बरे झालेले मृत्यू
महाराष्ट्र 1351153 1049947 35751
आंध्र प्रदेश 681161 612300 5745
तामिळनाडू 586397 530708 9383
कर्नाटक 582458 469750 8641
उत्तराखंड 390875 331270 5652
गोवा 273098 240703 5272
पश्चिम बंगाल 250580 219844 4837
ओडिशा 212609 177585 866
तेलंगणा 189283 158690 1116
बिहार 180032 166188 892
केरळ 179923 121264 698
आसाम 173629 142297 667
हरियाणा 134623 114576 3431
राजस्थान 130971 109472 1456
हिमाचल प्रदेश 125412 108411 1331
मध्य प्रदेश 124166 100012 2242
पंजाब 111375 90345 3284
छत्तीसगड 108458 74537 877
झारखंड 81417 68603 688
उत्तर प्रदेश 47502 36646 580
गुजरात 32396 27072 407
पुडुच्चेरी 26685 21156 515
जम्मू आणि काश्मीर 14457 10607 175
चंदीगड 11678 9325 153
मणिपूर 10477 7982 64
लडाख 4152 3064 58
अंदमान निकोबार 3803 3582 53
दिल्ली 3015 2836 2
मिझोरम 1958 1459 0

स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

11: 30 IST ला शेवटचं अपडेट

राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र असं असतानाही उद्योगपती कपिल वाधवान याच्या कुटुंबातील 23 लोक महाबळेश्वरला गेले होते. खंडाळा ते महाबळेश्वर असा त्यांनी प्रवास केला.

महाबळेश्वरमध्ये तपासणी दरम्यान प्रशासकीय यंत्रणेला हे कुटुंब सापडले. या सगळ्यांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्या आला आहे.

वाधवा कुटुंबीय हे DHFL घोटाळ्याशी संबंधित आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय, तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करणार असल्याचं सांगितलं.

जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत गृह मंत्रालयाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

2) कोरोना व्हायरस : बांधकाम क्षेत्राला एक लाख कोटींचा फटका

कोरोना व्हायरसमुळे भारतात 21 दिवसांचं संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्यामुळे देशभरातल्या बांधकाम उद्योगांना अंदाजे एक लाख कोटींचा फटका बसल्याची माहिती डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी दिली. डॉ. हिरानंदानी हे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलचे अध्यक्ष आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

कोरोना
लाईन

बांधकाम उद्योगाला पुन्हा भरारी घेण्यासाठी 200 अब्ज रुपये इतक्या भरभक्कम आर्थिक मदतीची गरज असल्याचं मतही डॉ. हिरानंदानी यांनी व्यक्त केलं.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही परिसरात घरांच्या किंमती दहा ते पंधरा टक्क्यांनी खाली येतील. पण मागणी अधिक आणि पुरवठा कमी आहे, तिथं किंमती कमी होण्याची शक्यता नाही,” असा अंदाज डॉ. हिरानंदानी यांनी वर्तवला.

3) कोरोना व्हायरस: मुंबईतील 381 ठिकाणं कंटेनमेंट झोन घोषित

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. एक जरी रुग्ण आढळला, तरी संपूर्ण इमारत किंवा गरज भासल्यास परिसर प्रतिबिंधित करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत मुंबईतील 381 ठिकाणं प्रतिबंधित म्हणजेच कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेत. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

31 मार्चपर्यंत मुंबईत 146 कंटेनमेंट झोन होते. मात्र, आता ही संख्या गुरुवारपर्यंत 381 वर पोहोचलीय. म्हणजे अवघ्या सात-आठ दिवसात 235 ठिकाणांना सील करावं लागलं.

मुंबईतील रुग्णांच्या संख्येनं 700 चा टप्पा पार केलाय, तर राज्यातील सर्वाधिक बळीही मुंबईतच गेलेत. आतापर्यंत 45 जणांचा कोरोनामुळं एकट्या मुंबईत मृत्यू झालेत.

4) कोरोना व्हायरस : मुलाला आणण्यासाठी आईनं 1400 किमी स्कूटी चालवली

कोरोना व्हायरसमुळं देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकजण आपल्या घरापासून दूर अडकून पडले. निझामाबादमधील बोधन इथं शिक्षिका असलेल्या रझिया बेगम यांचा मुलगा आंध्र प्रदेशातील नेल्लोर शहरात अडकल्यानं, त्यांनी स्कूटीवर जाऊन मुलाला परत आणलं. निझामाबाद ते नेल्लोर हा येऊन-जाऊन 1400 किलोमीटरचा प्रवास त्यांनी स्कूटीवर केला. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

ु

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

आंध्र प्रदेशातून मुलाला आणण्यासाठी रझिया यांनी पोलिसांकडून परवागनीचं पत्रही घेतलं होतं. त्यामुळं जिथं त्यांना अडवलं गेलं, तिथून या पत्राद्वारे त्यांना पुढे जाता आलं. मात्र, हा 1400 किलोमीटरचा प्रवास फार कठीण होता, असं रझिया सांगतात.

रझिया यांचा मुलगा निझामुद्दीन शिक्षणासाठी नेल्लोरमध्ये असतो. मात्र, लॉकडाऊनमुळं त्याला घरी परतणं कठीण होऊन बसलं. त्यामुळं रझिया यांनीच आपली स्कूटी काढली आणि मुलाला घरी परत आणलं.

5) नर्स म्हणून काम करू द्या, कल्याणच्या महापौरांचं आयुक्तांना पत्र

कोरोना व्हायरसबाधित रुग्णांच्या सेवेसाठी मला पुन्हा नर्स म्हणून काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारं पत्र कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी मनपा आयुक्तांकडे केलीय. विनिता राणे यांनी 32 वर्षं मुंबईतील नायर रुग्णालयात नर्स म्हणून काम केलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

Facebook/Vineeta Rane

फोटो स्रोत, Facebook/Vineeta Rane

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त डॉक्टरांना पुन्हा सेवेबाबत आवाहन केलं. त्यानंतर महापौर विनिता राणे यांनी आयुक्तांना पत्र लिहून पुन्हा नर्सचं काम करण्याची परवानगी मागितली.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या लक्षणीयरित्या वाढतेय. नुकतेच पाच नवे रुग्ण आढळल्यानं कल्याण-डोंबिवलीतील एकूण रुग्णांची संख्या 43 वर पोहोचलीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)