कोरोना: लॉकडाऊन काळात बिबट्या खरंच मानवीवस्तीत शिरला होता का? - फॅक्ट चेक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रुती मेनन
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक, दिल्ली
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या पण त्या खऱ्या होत्या का?
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. मात्र त्याचवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवली जात आहे.
लॉकडाऊन काळात बिबट्या खरंच वस्तीत शिरला होता का?
पंजाबमध्ये नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जालंधर जिल्ह्यातल्या एका शहरातल्या वस्तीचा हा व्हीडिओ आहे. यामध्ये बिबट्या बिल्डिंगच्या गच्चीवरून, कुंपणावरून उड्या मारताना दिसत आहे. बिबट्याचा मुक्त संचार पाहून लोक भीतीने पळत आहे असं या व्हीडिओत दिसतं आहे. बिबट्याने लॉकडाऊन तोडलं असं म्हणत अनेकांनी #coronavirus आणि #covid19 या हॅशटॅगसह हा व्हीडिओ शेअर केला आहे.

फोटो स्रोत, Social media
फेसबुकवर या व्हीडिओची पोस्ट 5,500 हून अधिक लोकांनी पाहिली आहे. या व्हीडिओ खालच्या कमेंट्स वाचणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हा व्हीडिओ वर्षभरापूर्वीचा असल्याचं काहींनी म्हटलं आहे. जालंधर बिबट्या हल्ला असं तुम्ही गुगलवर सर्च केलंत तर तुम्हाला हा व्हीडिओ दिसेल. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला हा प्रसंग घडला होता. भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या घटनेची दखल घेतली होती.
कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि बिबट्याचा दुरान्वयेही संबंध नाही.
आदर्श सोशल डिस्टन्सिंग
लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मिझोरम राज्यातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. सोशल डिस्टन्सिंगची आदर्श पद्धत या नावाने हे फोटो होते.
अन्य देशवासीयांनी मिझोरमवासीयांकडून प्रेरणा घ्यावी असंही यात म्हटलं होतं. कारण अनेक भागांमध्ये लॉकडाऊनचं पालन केलं जात नव्हतं.

फोटो स्रोत, AFP
मात्र हे फोटो मिझोरमचे नसून म्यानमारचे असल्याचं स्पष्ट झालं. रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर हे फोटो म्यानमारचे असल्याचं लक्षात आलं. फिलिपीन्सस्थित एबीएस-सीबीएन न्यूजने हे फोटो म्यानमारचे म्हणून दाखवले होते.
म्यानमारमधल्या फेसबुक युझर्सनी हे फोटो शेअर केले होते. हा फोटो झूम करून पाहिला तर म्यानमारमधील दुकानांवरील चिन्हं तसंच त्या भाषेतील जाहिराती दिसू शकतात.
आल्प्समधल्या शिखरावरून भारताचे धन्यवाद मानण्यात आले का?
आल्प्स पर्वतराजीतील मॅटरहॉर्न या शिखरावर भारताच्या झेंड्याची प्रतिमा दर्शवण्यात आली असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने भारताने मोलाची भूमिका बजावल्याने आल्प्स पर्वतराजीतल्या शिखरावर भारताचा झेंडा दर्शवून अभिवादन करण्यात आलं. सत्ताधारी पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात ट्वीट केलं होतं.

फोटो स्रोत, Social media
भाजपचे नॅशनल जनरल सेक्रेटरी बी.एल. संतोष यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँटी मलेरिया हायड्रोक्लोरोक्वीनचा अन्य देशांना पुरवठा केल्याबद्दल भारताचे आभार मानण्यात आले.
कोरोना विषाणूवर अद्याप लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने हायड्रोक्लोरोक्वीनचा पुरवठा अन्य देशांसाठी महत्त्वाचा ठरला आहे.
हायड्रोक्लोरोक्वीनचा भारत सगळ्यांत मोठा निर्यातदार देश आहे. भारताकडून 55 देशांना या औषधाचा पुरवठा केला जात आहे. मात्र स्वित्झर्लंडला या औषधाचा पुरवठा होत नाही.
मात्र या शिखरावर भारतीय तिरंगा फडकण्यामागे या औषधाचा पुरवठा हे कारण नाही. या परिसरातील स्थानिक पर्यटन विभागातर्फे विविध देशांचे झेंडे प्रतीकात्मक अर्थात इलेक्ट्रिक पद्धतीने फडकावला जातो.
तुम्ही या लिंकवर दररोज कुठल्या देशाचा झेंडा फडकावला जातो हे पाहू शकता.
मुस्लीम व्यक्ती कोरोना काळात थुंकला होता का?
मुस्लीम व्यक्ती अंगावर थुंकला असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता. यानंतर देशभरात इस्लामोफोबिया निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती.
या व्हीडिओत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत काही लोक चालले आहेत असं व्हीडिओत दिसतं. बंगाली भाषेत टेक्स्ट येतो- त्याचा साधारण अर्थ असा की दिल्लीतल्या निझामुद्दीन इथले जमाती पोलिसांच्या अंगावर थुंकत आहेत.

फोटो स्रोत, Social media
राजधानी दिल्लीतल्या निझामुद्दीन भागात तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला देशभरातून तसंच देशाबाहेरूनही अनेकजण एकत्र जमले होते. कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्यासाठी हा कार्यक्रम कारणीभूत ठरला होता.
मुस्लीम व्यक्ती थुंकत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. मात्र हा व्हीडिओ दिशाभूल करणारा आहे.
रिव्हर्स इमेजद्वारे शोध घेतल्यानंतर हे स्पष्ट झालं की की दिल्लीतल्या तबलीगी समाजाच्या कार्यक्रमाचा आणि या फोटोचा काहीच संबंध नाही.
मुंबई मिररने फेब्रुवारीत दिलेल्या वृत्तानुसार, 26 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. खाण्यावरुन त्याचं आणि पोलिसांचं भांडण झालं. त्यानंतर हा प्रसंग घडला होता. हा व्हीडिओ ठाण्यातला आहे, दिल्लीचा नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















