दलित शेतकरी मारहाण प्रकरण: 'पोलिसांनी माझ्या सात महिन्याच्या बाळालाही सोडलं नाही'

फोटो स्रोत, Shuriah niyazi/bbc
- Author, शुरैह नियाजी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मध्यप्रदेशात पोलिसांनी दलित कुटुंबावर अत्याचारच्या सर्व मर्यादा पार केल्याचा आरोप राजकुमार अहिरवार यांनी केलाय. पोलिसांनी त्यांची पत्नी, आई आणि भावासोबत लहान मुलांनाही सोडलं नसल्याचं राजकुमार अहिरवार यांनी सांगितलं.
राजकुमार आणि त्यांची पत्नी सध्या गुणा इथल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी सांगितलं, "शेतात आलेल्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही गयावया केली, पण त्यांनी एकदाही आमचं ऐकलं नाही. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करत बाजूला व्हायला सांगितले. त्यानंतर माझ्या कुटुंबावर हल्ला चढवला."
राजकुमार यांनी रुग्णालयातून फोनवर बोलत असताना सांगितले की, त्यांची पत्नी, आई आणि भावाबरोबरच सात महिन्याचा चिमुकलाही पोलिसांच्या शोषणाचा बळी ठरला. त्यांची पत्नी सावित्री अद्याप बेशुद्ध असून बोलण्याच्याही मन:स्थितीत नाही.
शेतीत पिकवलेल्या धान्याचे नुकसान नको म्हणून त्यांनी प्रशासनाकडून केवळ दोन महिन्याची मुदत मागितली असल्याचं राजकुमार यांची आई गीताबाई यांनी सांगितलं. गब्बू पारदी यांच्याकडून राजकुमार यांनी ही शेतजमीन बटाईसाठी घेतली आहे. पारदी या जमिनीवर 35 वर्षांपासून शेती करत आहेत.
त्या सांगतात, "गब्बू पारदी एवढ्या वर्षांपासून ही जमीन कसत होते. त्यामुळे ते या जमिनीचे मालक नाहीत याची कल्पना आम्हाला कशी असेल? गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या जमिनीवर शेती करतोय."
ते शेती करत असलेली ही जमीन जवळपास 40 एकर असल्याचं गीताबाई यांनी सांगितले. ही जमीन आमची असल्याचा दावा आम्ही कधीही केला नसल्याचं अहिरवार कुटुंबाचे म्हणणं आहे.
या जमिनीवरच सगळं कुटुंब अवलंबून
या जमिनीवर राजकुमार अहिरवार आपली पत्नी आणि सहा मुलांसहित राहतात. त्यांच्यासोबत आई-वडील आणि त्यांचा भाऊ शिशुपालसुद्धा राहतात. शिशुपाल यांचे लग्न झालेले नाही. राजकुमार यांना चार मुलं आणि दोन मुली आहेत.

फोटो स्रोत, Shuraih niyazi
अधिकारी किंवा पोलिसांसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप अहिरवार कुटुंबाने फेटाळला आहे. गीताबाई सांगतात की, पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह याच जमिनीवर अवलंबून असल्याने आम्ही कारवाईला विरोध केला. या कारणाने त्यांचा मुलगा आणि सुनेनं किटकनाशक पीऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांना पदावरुन हटवले, तर दुसऱ्याच दिवशी सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पोलीसांनी कुटुंबातील सदस्यांना प्रचंड मारहाण केल्याचे या व्हीडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमधून स्पष्ट झाले. राजकुमार यांच्या सहा मुलांसाठी हे सर्वकाही धक्कादायक होतं. ती मुलं हे सगळं पाहून रडत होती. मदतीसाठी ओरडत होती. त्यांची हाक व्हीडिओमध्ये स्पष्ट ऐकू येते.
त्यादिवशी नेमके काय झाले?
ही घटना शहरातील कैंट पोलिस ठाण्याच्या हद्दीतलं क्षेत्रातील आहे. शहरातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या नेतृत्वात एक टीम त्याठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी पोहचली. याठिकाणी राजकुमार शेती करतात. पोलीसांनी आदेश दिल्याप्रमाणे जेसीबी मशिन वापरुन काम सुरू झाले.

फोटो स्रोत, Getty Images
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

राजकुमार आणि त्यांच्या पत्नीने याला विरोध केला. पण पोलिसांनी त्यांना माराहण केली. त्यांनी पिकवलेलं धान्य ते उद्ध्वस्त करत होते. यानंतर राजकुमार आणि त्यांच्या पत्नीने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही जमीन आदर्श महाविद्यालयासाठी राखीव ठेवण्यात आली होती. माजी नगरसेवक गप्पू पारदी यांनी ही जमीन बळकावल्याचा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे. पारदी यांनी राजकुमार यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना ही जमीन शेतीसाठी दिली होती.
या जमिनीवर शेती करण्यासाठी राजकुमार यांनी जमीन उधारीवर घेतली होती. शेतीतूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं काहीही न ऐकता त्यांना मारहाण केली.
मारहाण करुनही पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही म्हणून त्यांनी कीटकनाशक घेतलं. कीटकनाशक प्यायल्यानंतर दोघेही जमिनीवर पडले पण तरीही अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत.
राजकुमार यांच्या कुटुंबाकडून ही घटना मोठी करुन सांगितली जात असल्याचं तिथे उपस्थित कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. पण त्याठिकाणी राजकुमार यांचा भाऊ पोहचला तेव्हा त्यालाही पोलिसांनी मारहाण केल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी, बसपा नेत्या मायावती यांच्यासह अनेक नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला. मध्यप्रदेशातही विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससोबतच भाजपा नेता ज्योतिरादित्य शिंदे यांनीही पोलिसांवर टीका केली. शिवाय, विविध संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)



















