चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

चेतन चौहान

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे निधन झाले आहे. त्यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी ही माहिती दिली आहे.

चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांचे निधन झाले.

"माझे बंधू चेतन चौहान यांनी कोरोनाशी झुंज दिली मात्र आज ही झुंज थांबली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी शुभेच्छा, सदिच्छा आणि प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. त्यांचा मुलगा विनायक लवकरच पोहोचत आहे. तो अंतिम विधी करेल", असं चेतन यांचे बंधू पुष्पेंद्र यांनी म्हटलं आहे.

चेतन यांचा उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. मात्र वडिलांच्या लष्करातील नोकरीमुळे कुटुंबीयांसह ते पुण्याला रवाना झाले. पुण्यातल्या वाडिया कॉलेजचे ते विद्यार्थी. रोहिंटन बारिया चषक स्पर्धेत त्यांनी पुणे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

विझी चषकातील चांगल्या कामगिरीमुळे त्यांची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली. 1972-73 हंगामात चेतन यांनी रणजी स्पर्धेत महाराष्ट्रासाठी खेळताना 873 धावा केल्या. त्या हंगामात त्यांनी गुजरात आणि विदर्भ संघाविरुद्ध द्विशतक झळकावलं होतं. 1975 मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केलं. भारतीय संघासाठी खेळताना सुनील गावस्कर आणि चेतन यांनी 11 शतकी भागीदाऱ्या केल्या.

चेतन चौहान

फोटो स्रोत, @GautamGambhir

चेतन यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. सुनील गावस्कर आणि त्यांची जोडी सलामीला येत असे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं.

खेळातून बाजूला झाल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून ते 1991 आणि 1998 मध्ये लोकसभेवर निवडून गेले. मात्र 1996, 1999, 2004 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

1981 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी जून 2016 ते जून 2017 असं वर्षभर काम पाहिलं. ऑगस्ट 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील सरकारमध्ये ते युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते.

चेतन यांनी डीडीसीए अर्थात दिल्ली अँड ड्रिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसंच निवड समितीचे प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. टीम इंडियाचे मॅनेजर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)