डॉ. पुष्पा भावे; वर्गाच्या भिंतीबाहेर शिकवणाऱ्या बाई

पुष्पा भावे

फोटो स्रोत, Pradnya Daya Pawar

    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

ज्येष्ठ लोकशाहीवादी कार्यकर्त्या, कृतीशील विचारवंत, समीक्षक आणि निर्भिड वक्त्या डॉ. पुष्पा भावे यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. आणीबाणीनंतरच्या राजकीय जाणीवांचा जागर आपल्या विचार आणि कृतीतून करणाऱ्या पुष्पाताईंनी महाराष्ट्रातल्या शोषणाविरोधातल्या आंदोलनात आणि मानवतावादी लढ्यांमध्ये हिरीरीने भाग घेतला, प्रसंगी नेतृत्वही केलं. त्यांचं योगदान सांगणारा हा लेख.

पुष्पाबाई... त्यांना अनेकजण 'बाई'च म्हणत. अजूनही म्हणतात, ते त्यांच्या शिक्षकी पेशामुळे. पुढे बाई हे बिरुद अधिक गडद होत गेलं आणि स्थिरावत गेलं ते त्यांच्या विचारप्रवर्तक आणि मार्गदर्शक वृत्तीमुळे.

मुंबईतील दादरच्या रुईया कॉलेजमध्ये पुष्पाबाईंनी मराठी विभागात अनेक वर्ष अध्यापन केलं. पण इंग्रजीसह इतर भाषांतरित फ्रेंच आणि साऊथ अमेरिकन साहित्याचा त्यांचा व्यासंग कायम राहिला.

बाई केवळ वर्गांच्या चार भिंतीत आणि अभ्यासक्रमातील पुस्तकातलं शिकवत राहिल्या का? यावर त्यांचे अनेक विद्यार्थी भरभरुन बोलतात.

त्यांच्या विद्यार्थिनी असलेल्या आकाशवाणीच्या माजी अधिकारी मेधा कुलकर्णी सांगतात, "कॉलेजच्या वर्षांमध्ये परीक्षेत उत्तम मार्क्स मिळवण्यापलिकडचं आयुष्यभर सोबत राहिल असं संचित बाईंनी दिलं. मला आठवतंय, बाई 'संगीत शारदा' नाटक शिकवत होत्या. तेव्हा त्यांनी स्त्रियांसोबत होणारा लिंगभेदभावाचा इतिहास उलगडून सांगणं असो की मराठी वाङमय त्याच्या सामाजिक चौकटीसह शिकवणं असो.. हे बाईंनी केलं."

पुष्पा भावे

फोटो स्रोत, Medha Kulkarni

मेधा कुलकर्णी यांनी 'लढे आणि तिढे, चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी' हे मुलाखतीवर आधारित पुस्तक लिहिलंय. त्यात बाईंचं चिकित्सक व्यक्तिमत्व उलगडायला मदत होते.

सुती साडी, साधं राहणीमान स्वीकारण्यामागे पुष्पाबाईंच्या घरातले गांधीवादी संस्कार कारणीभूत ठरले. पण त्या स्वतःला कधी गांधीवादी म्हणवून घेत नसत. सरकार कुटुंबात जन्म झालेल्या बाईंचे आजोबा प्रार्थना समाजाचे कट्टर कार्यकर्ते होते.

देवधर्माला प्रखर विरोध आणि दुसरीकडे देव-धर्म पाळणं त्यामुळे वाद-प्रतिवाद असं घरातलं वातावरण. तर त्यांचे वडील प्रभाकर सरकार आणि सुनंदा सरकार पुस्तकवेडे होते. इतके की सणासुदीला एकवेळ कपडे नसले तरी चालतील पण पुस्तक द्यायची पद्धत होती, असं बाई सांगत.

स्वातंत्र्यपूर्व काळातून पुढे स्वतंत्र भारतात वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक मुशीतून साहित्य, कला-संस्कृती आकार घेत होती. तोपर्यंत मुंबईतल्या सांस्कृतिक विश्वाबाहेर त्यांचा परिचय झाला नव्हता.

प्राध्यापक म्हणून रुईया कॉलेजमध्ये रुजू झाल्या होत्या. प्राध्यापक आणि दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक अनंत भावे यांच्याशी त्यांनी विवाह केला. या दांपत्याने जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यात सुती कपड्यांचा पुरस्कार केला.

पुष्पा भावे

फोटो स्रोत, NANDU MADHAV

विद्यार्थी चळवळीच्या निमित्ताने त्या मराठवाडा आणि नंदूरबारशी जोडल्या गेल्या. मराठवाड्यात नाट्यचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला.

1972 साली आलेल्या नाटककार विजय तेंडुलकर यांच्या सखाराम बाईंडर या नाटकाचा वाद उफाळून आला होता. त्यावेळी नाटकाची पाठराखण करण्यात पुष्पाबाई पुढे होत्या.

त्या वादाबद्दल सांगताना त्या नेहमी म्हणत- "मी लोकांना विचारायचे की आज अश्लिलतेच्या कारणासाठी सरकारने नाटकावर बंदी घालावी असं तुम्ही म्हणाल. उद्या वेगळ्या कारणासाठी सरकारने बंदी घालावी असं म्हटलं जाईल, तेव्हा तुम्ही काय म्हणाल?"

त्याच दरम्यान माणूस साप्ताहिकात त्यांचं नाट्य समिक्षेवरचं सदर सुरू होतं. ते विशेष गाजलं. त्यावेळी वेगळ्या प्रवाहाच्या नाटकांवर विशेषतः अमोल पालेकर, खानोलकर, तेंडुलकर यांच्या नाटकांवर लिहिताना मानवी मूल्यं आणि विचार स्वातंत्र्याच्या बाजूने उभ्या राहिल्या असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सांगतात.

पुष्पा भावे

फोटो स्रोत, Medha Kulkarni

नाट्यसमिक्षेतील विचार स्वातंत्र्याचा धागा त्यांच्या आयुष्यात सर्वत्र दिसतो, असं ते म्हणतात. "आणीबाणीच्या काळात त्यांचा राजकारणाशी थेट संबंध आला. नागरिक स्वातंत्र्याचं हनन झालेलं होतं, त्या परिस्थितीत पुष्पाबाई अस्वस्थ दिसत."

"रुईया कॉलेजमध्ये सायन्स शिकत असतानाही पुष्पाबाईंच्या विचारांचा, लिखाणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत होता. पुष्पाबाईंकडून प्रेरणा घेतलेली एक मोठी पिढी असल्याचं लक्षात येईल."

आणीबाणीतल्या पुष्पाबाईंच्या कामाचा निखिल वागळे आवर्जून उल्लेख करतात. बाई आणीबाणीत कधी तुरुंगात गेल्या नाहीत, भाषणं केली नाहीत किंवा राजकारणात सक्रियही नव्हत्या. पण भूमिगत चळवळीतले मृणाल गोरे, पन्नालाल सुराणा यांच्यासारखे राजकीय नेते भूमिगत होऊन काम करत होते तेव्हा त्यांना पुष्पाबाईंनी आपल्या दादरच्या हिंदू कॉलनीतल्या आपल्या घरात आश्रय दिला होता.

धरपकड होण्याची भीती असतानाही त्यांनी धोका पत्करला. इतकंच नाही तर पत्रकं काढून ती लोकांमध्ये प्रसारित करणं हे पुष्पाबाईंचं मोठं योगदान म्हणावं लागेल."

पुष्पा भावे

फोटो स्रोत, Medha Kulkarni

पुढे जनता पक्षात सक्रीय होत त्या काही महिन्यांसाठी राजकारणात आल्या. पण त्यांनी भ्रमनिरास झाल्यामुळे राजकारण सोडून दिलं असावं, असं निखिल वागळे सांगतात.

आणीबाणीनंतर पुष्पाबाईंनी आपली प्राध्यापकी करताना महाराष्ट्रातल्या अनेक चळवळींना आणि आंदोलनांना जोडून घेतलं. मराठवाडा विद्यापीठ, नामांतर चळवळ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासोबत देवदासी प्रथा निर्मूलनाचा लढा, दलित महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज, हमाल कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या चळवळींमध्ये साथ, धार्मिक विधीसाठी लहान मुलांच्या गैरवापराविरोधात उठवलेला आवाज अशा अनेक लढ्यांमध्ये त्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. भारत पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसीसारख्या गटातही त्यांचा अनेक वर्ष सहभाग राहिला.

सामाजिक काम करणाऱ्या आणि धर्म किंवा राजकीय पक्षाचं काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सामाजिक कृतज्ञता निधीच्या त्या विश्वस्त होत्या. सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या अनेक संस्थांना आणि माणसांना बळ दिलंय.

पुष्पाबाई खऱ्याखुऱ्या अर्थाने विद्यापीठ होत्या, असं कवयत्री आणि लेखिका प्रा. प्रज्ञा दया पवार म्हणतात. "सामाजिक जडण-घडणीत सक्रीय काम करणारे लोक एकतर वैचारिक मांडणी करणारे असतात आणि दुसरे अॅक्टिविस्ट असतात. बाईंमध्ये Academic असणं होतं आणि प्रत्यक्ष विचार कामात आणणंही होतं"

पुष्पा भावे

फोटो स्रोत, Pradnya Daya Pawar

फोटो कॅप्शन, प्रज्ञा दया पवार आणि पुष्पा भावे

"त्यांनी कोणताही प्रश्न सुटा-सुटा पाहिला नाही. ऐंशीच्या दशकात स्त्रीमुक्तीचा लढा जोमात होता. स्त्रीवादाची मांडणी करताना सर्व स्त्रियांचे प्रश्न सारखे आहेत हे जरी खरं असलं तरी ते मिथ असल्यासारखं जाणवू लागलं होतं.

त्यातील काहींनी दलित-मुस्लीम-आदिवासी स्त्रीवर होणारे अत्याचार आणि इतर स्त्रीवर होणारे अत्याचार याचा वेगळा विचार झाला पाहिजे अशी मांडणी सुरू झाली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या पुष्पा भावे होत्या. अंतर्गत कंगोरे घेऊन एकत्र येण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्नही केले."

पण त्यांच्या अशा एका लढ्याविषयी स्वतंत्रपणे, पण विस्तृत सांगणं आवश्यक आहे. 1996 साली रमेश किणी खून प्रकरणात त्या एकट्या लढल्या.

पुष्पाबाईंच्याच शब्दात सांगायचं तर- "किणी प्रकरणात मला लोकांना बरोबर घेऊन लढता आलं नाही, हा माझ्यावरचा आरोप मला मान्य आहे. रमेश किणीचं घर माझ्या घराजवळ होतं. तो एक दिवस नाहीसा झाला आणि त्याचं शव पुण्यात सापडलं, ही बातमी मला कळली. तो माझ्या आईचा विद्यार्थी असल्याने मी त्याच्या पत्नीला भेटायला गेले.

पुष्पा भावे

फोटो स्रोत, Medha Kulkarni

त्याची पत्नी शीला किणी आतल्या खोलीतून बाहेर आली आणि मला म्हणाली, 'बाई, मी तुमचीच वाट पाहात होते.' तिथून पुढे मी याचा पाठपुरावा करायला सुरूवात केली. आता याला आंदोलन म्हणायचं का? तर मला वाटतं हो. हे आंदोलनच होतं. मी कोर्टात केस उभी केली. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सीबीआयने चौकशी केली. कोर्टातच कागदपत्रं गहाळ झाल्याचं कळलं.

पुरेशा पुराव्यांअभावी कोर्टात केसचा निकाल लागला नाही. यातून एक मात्र झालं की पूर्वी ठाकरे घराण्यावर बोलायला कोणी तयार नव्हते असं वातावरण होतं ते धाकाचं वातावरण सैल झालं."

रमेश किणी खून खटला आणि पुष्पाबाईंचा लढा निखिल वागळेंनी अतिशय जवळून पाहिलाय. तेव्हा ते दैनिक 'आपलं महानगर'चे संपादक होते.

"शीला किणी यांच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलेला नवऱ्याचा खून झाल्यानंतर कोणा राजकीय व्यक्तीचा किंवा पक्षाचा आधार वाटला नाही, तर तो पुष्पाबाईंचा वाटला. राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप होते ते सगळे सुटले. पण मुंबईत शिवसेनेचा दबदबा असताना त्याविरोधात बाई ठामपणे उभ्या राहिल्या होत्या."

"त्या एकट्या असल्या तरी सायलेंट मेजॉरिटी असलेल्या लोकांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. जेव्हा इतर लोक बोलत नाहीत तेव्हा त्या बोलत होत्या, हेच पुष्पाताईंचं वैशिष्ट्य होतं. नागरिकांच्या विवेकाधिष्ठीत आवाजाचं पुष्पाताई प्रतिक होत्या."

वागळे पुढे म्हणतात- "खणखणीत या शब्दाला पर्यायी शब्द शोधायचा झाला तर पुष्पाबाईंचं नाव घ्यावं लागेल"

पुष्पा भावे

फोटो स्रोत, Pradnya Daya Pawar

गेली पाच वर्ष पुष्पा भावे मधुमेहाशी संघर्ष देत होत्या. याच काळात त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अनुवाद सुविधा केंद्राला आकार दिला. अनेक कार्यकर्ते घडवणाऱ्या पुष्पाबाईंना तरुण लेखक, कवी, नाट्य-सिनेदिग्दर्शक यांच्यासोबत संवाद महत्त्वाचा वाटत होता.

या कामात त्यांच्यासोबत असलेले साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे युवराज मोहिते सांगतात- "तरुणांसोबत साहित्य-संस्कृतीच्या अंगाने विद्यार्थीदशेपासून काम सुरु केलं पाहिजे. त्यासाठी नवं तंत्र आत्मसात करायला हवं. म्हणूनच त्या देशभरातील नवीन हुंकार असणाऱ्या तरुण साहित्यिकांशी संवाद त्या साधत होत्या. त्यांचं जाणं हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे."

धारधार आवाज, स्पष्ट मांडणी आणि कणखर भूमिका यातून पुष्पाबाईंच्या शब्दांची नाळ वर्गाच्या चार भिंतीबाहेर रस्त्यावर जोडली होती. साठ वर्षांहून अधिक काळ या शब्दांनी चळवळी घडवल्या आणि माणसंही घडवली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)