पदवीधर निवडणूक निकाल : तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं - अनिल परब, #5मोठ्याबातम्या

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, FACEBOOK/CMO MAHARASHTRA

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. पदवीधर निवडणूक : तीन चाकांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं - अनिल परब

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तीन पक्षांच्या रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवलं, असं वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.

भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री परब यांनी हे वक्तव्य केलं. पदवीधर निवडणुकीत भाजपच्या पराभवाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनेच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. यावर परब यांनी प्रतिक्रिया दिली.

"तीन पक्ष एकत्र आले तर काय निकाल लागू शकतो, हे महाविकास आघाडीने दाखवून दिलं आहे, ती जागा यापूर्वीही शिवसेनेची नव्हती. याआधीही तिथे अपक्ष उमेदवार निवडून यायचे. आताही तिथे अपक्षच निवडून आले आहेत," असं परब यांनी म्हटलं आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

2. मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन, 9 रोजी सुनावणी

राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने विनंती अर्ज केला होता. याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे.

बुधवारी (9 डिसेंबर) दुपारी 2 वाजता या अर्जावर सुनावणी होईल, अशी माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यातील मराठा समाजाच्या SEBC आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. या प्रकरणी राज्याने सर्वोच्च न्यायालयात चार विनंती अर्ज दाखल केले आहेत.

यासाठी घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही अर्जात नमूद करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

मराठा आरक्षण

फोटो स्रोत, Getty Images

3. अन्वय नाईक प्रकरणात आरोपपत्र दाखल

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलीबाग न्यायालयात शुक्रवारी (4 डिसेंबर) आरोपपत्र दाखल केलं आहे.

यामध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरुद्ध आरोप लावण्यात आले आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हे आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणात रायगड पोलिसांनी 65 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात नोंदवले आहेत.

अलीबाग सत्र न्यायालयात हे प्रकरण जाईल. सुनावणीसाठी अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

4. एअर-इंडिया विकत घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

एअर इंडिया ही भारताच्या सरकारी विमान कंपनी विकत घेण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कंपनीतील सुमारे 209 कर्मचारी एका खासगी कंपनीची मदत घेणार आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक-एक लाख रुपयांची वर्गणी काढली जाईल, तसंच इक्विटी फंडच्या माध्यमातून कंपनी विकत घेण्यासाठीची बोली लावली जाईल.

एअर इंडियाच्या वाणिज्य संचालक मीनाक्षी मलिक या कर्मचाऱ्यांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहलं आहे.

PIM नुसार (प्राथमिक सूचना निवेदन) एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीची मालकी मिळवता येऊ शकते. त्यासाठी काही अटी-शर्तींची पूर्तता करणे गरजेचे आहे. मात्र, आपण सामूहिकपणे एअर इंडिया खरेदी करू शकतो, असं मीनाक्षी मलिक यांनी पत्रात म्हटले आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

एअर इंडियाला आता तरी कुणी विकत घेणार का?

5. शेतकरी संघटनांची 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा

केंद्र सरकार तीन कृषि विधेयक मागे घेत नसल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंद करण्याची घोषणा केली आहे. सिंघू बॉर्डर येथे पत्रकार परिषदेत आंदोलक शेतकऱ्यांनी ही घोषणा केली.

या बंदमध्ये देशभरातील संघटनांनी सहभागी व्हावं, असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे.

आज (5 डिसेंबर) शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या टप्प्यातील चर्चा होणार आहे. यामध्ये तोडगा न निघाल्यास दिल्लीतील भाजीपाला तसंच इतर सामग्री बंद करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.

दरम्यान, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हटवण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. शेतकरी आंदोलकांना सीमेवरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)