अमिताभ बच्चन आणि भारतीय सिनेमाचा वारसा जतन करण्यासाठीचा संघर्ष

फोटो स्रोत, Film Heritage Foundation
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतल्या आपल्या बंगल्यात त्यांचे 60 सिनेमे जतन करून ठेवले होते. गेली अनेक वर्षं एका एसी खोलीत त्यांनी त्यांचा हा ऐवज जपून ठेवला होता.
पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या चित्रपटांच्या प्रिंट्स मुंबईतल्याच एका स्वयंसेवी संस्थेच्या एअर कंडिशन संग्रहालयात ठेवण्यासाठी दिल्या.
सिनेमांच्या प्रिंट्स नीट करून जतन करण्याचं काम ही संस्था करते. ख्यातनाम फिल्ममेकर, आर्कायव्हिस्ट आणि रिस्टोअरर शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांनी 'फिल्म हेरिटेज फाउंडेशन' या नावाने ही संस्था सुरू केली. संस्थेच्या उत्कृष्ट कामामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळाल्याचं दिग्दशर्क क्रिस्टोफर नोलान यांचं म्हणणं आहे. स्वतः अमिताभ बच्चन या संस्थेचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत.
वेगाने लोप पावत चाललेला भारताचा चित्रपट वारसा जतन करावा, यासाठी अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षं प्रयत्न करत आहेत.
अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षं यासाठी प्रयत्न करत असले तरी त्याची फारशी वाच्यता झाली नव्हती. गेल्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं हे काम लोकांपुढे आलं.
78 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांना यावर्षीच्या 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काईव्ह्ज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नोलान आणि फिल्ममेकर मार्टिन स्कोरसेजी यांनी हा पुरस्कार प्रदान केला. यापूर्वी इंगमार बर्गमन, अॅग्नेस वर्डा आणि जीन-ल्युक-गोडार्ड यासारख्या नामवंत सिनेदिग्दर्शक आणि निर्मात्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Film Heritage Foundation
डुंगरपूर सांगतात, "बच्चन यांना कायमच चित्रपटांचं संवर्धन आणि जतन करण्यात मनापासून रस होता आणि त्यांनी त्यादिशेने प्रयत्नही केले."
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या खूप जुन्या चित्रपटांच्या प्रतीच नष्ट झाल्याने ते सिनेमे आपल्याला पाहता आले नसल्याचं दुःख अमिताभ बच्चन यांनी एकदा बोलून दाखवल्याचं डुंगरपूर सांगतात.
भारतात बॉलीवुडसह तब्बल 10 महत्त्वाच्या फिल्म इंडस्ट्रीज आहेत. जगातल्या या सर्वांत मोठ्या सिनेसृष्टीमध्ये दरवर्षी 36 भाषांमध्ये जवळपास 2000 सिनेमे प्रदर्शित होतात.
मात्र, एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज असूनही आपल्याकडे केवळ दोन फिल्म आर्काईव्ह्ज (चित्रपट संग्रहालय) आहेत. एक पुण्यात आहे - नॅशनल फिल्म आर्काईव्ज ऑफ इंडिया आणि दुसरी डुंगरपूर यांची खाजगी संस्था. डुंगरपूर म्हणतात, "आपल्या श्रीमंत आणि देदिप्यमान चित्रपट इतिहासाच्या दृष्टीने ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे."
काही मोजक्याच चित्रपटांचं संवर्धन आणि जतन होत असल्यामुळे आपले अनेक दर्जेदार चित्रपट एकतर नष्ट झालेत किंवा त्यांच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत त्या खराब झाल्या आहेत.
आलम आरा (1931) हा भारताचा पहिला बोलपट तर किसान कन्या (1937) हा पहिला रंगीत चित्रपट. मात्र, या दोन्ही सिनेमांच्या प्रती आज उपलब्ध नाहीत.
तुलनेने नवीन असणाऱ्या सिनेमांचीही हीच व्यथा आहे. स्वातंत्र्यांसाठी लढणाऱ्या क्रांतीकारक लक्ष्मी सहगल यांच्यावर 1977 साली एक डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. त्यात सई परांजपे यांनी लक्ष्मी सहगल यांची भूमिका बजावली होती. त्यानंतर श्याम बेनेगल यांनी 1988 साली तयार केलेली भारत एक खोज ही डॉक्युमेंट्री, या दोन्ही माहितीपटाच्या मूळ प्रती आज अस्तित्वात नाहीत.
बाहुबलीसारखे गाजलेले चित्रपट देणारे दक्षिणेचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी 2009 साली 'मगदिरा' नावाचा चित्रपद दिग्दर्शित केला होता. या सिनेमाची ओरिजनल नेगेटिव्हही अवघ्या सहा वर्षांत गायब झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Film Heritage Foundation
मूकपटाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. भारतात एकूण 1138 मूकपट तयार करण्यात आले होते. यापैकी आज केवळ 29 मूकपट उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर 1930 ते 1950 या 20 वर्षांच्या काळात मुंबईत तयार करण्यात आलेल्या 2000 चित्रपटांपैकी 80% चित्रपट आज अस्तित्वात नाहीत.
डुंगरपूर आणि त्यांच्या टीमला गेल्या वर्षी मुंबईतल्या एका गोदामात तब्बल 200 चित्रपटांच्या प्रती सापडल्या. डुंगरपूर सांगतात, "तिथे चित्रपटांच्या प्रती आणि निगेटिव्ह्ज होत्या आणि त्या तिथे धूळ खात पडल्या होत्या."
ही व्यथा इथेच संपत नाही. सरकारी ऑडिटर्सने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या फिल्म आर्काईव्ह्जमधल्या जवळपास 31 हजार रिळं एकतर गायब झाली आहेत किंवा खराब झाली आहेत.
2003 साली राज्य सरकारच्या एका आर्काईव्ह्जमध्ये लागलेल्या आगीत जवळपास 600 सिनेमांचं नुकसान झालं. यात 1913 साली बनलेला भारतातला पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' या मूकपटाच्या शाबूत असलेल्या काही मूळ प्रतींचाही समावेश होता. दिग्दर्शक गौतम घोष म्हणतात, "तुम्ही तुमच्या इतिहासाचा आदर करायला हवा आणि इतिहासाचा आदर करायचा असेल तर तुमच्या चित्रपटांच्या प्रतींचं संवर्धन आणि जतन महत्त्वाचं आहे."
डिजिटल तंत्रज्ञान येण्यापूर्वी चित्रपट निगेटिव्ज, ड्युप्लिकेट्स आणि प्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रती अशा स्वरुपात जतन करून ठेवले जायचे. मात्र, डिजिटल तंत्रज्ञान आल्यानंतर अनेक चित्रपट लॅब्जने त्यांच्याकडे असलेल्या चित्रपट साठ्यांचं डिजिटायझेशन केलं आणि निगेटिव्ह्जचा आता काही उपयोग नाही, असा ग्रह करून त्या फेकून दिल्या. घोष म्हणतात, "मूळ कॅमेरा निगेटिव्ह्जचं रिझॉल्युशन आजच्या डिजीटल प्रिंटपेक्षा कितीतरी जास्त होतं. हे त्यांना माहिती नव्हतं."

फोटो स्रोत, Film Heritage Foundation
आज देशात चित्रपट संवर्धनाचं काम करणारे बहुतांश तज्ज्ञ प्रिंटवर काम करतात.
"हे मोठं नुकसान आहे. सेल्युलॉईड चित्रपट आणि त्यांच्या इतिहासाविषयी आपल्याला पूर्णपणे नवीन जागरुकता निर्माण करण्याची गरज होती," असं डुंगरपूर सांगतात.
डुंगरपूर आणि जगभरातल्या आघाडीच्या फिल्म आर्काईव्ज आणि संग्रहालयातील तज्ज्ञांच्या गटाने गेल्या सहा वर्षात संपूर्ण देशभर फिरून कार्यशाळा घेतल्या आणि चित्रपटांचं जतन आणि संवर्धनाचं 300 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं.
या संस्थेने आतापर्यंत भारतातल्या नामवंत फिल्म मेकर्सचे 500 चित्रपट, स्वातंत्र संग्रामातील फुटेज आणि काही भारतातील चित्रपटांचा संग्रह आणि संवर्धन केलं आहे. या संग्रहात अत्यंत दुर्मिळ फुटेजही आहे. यात भारतातले ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजीत रे आणि इटालियन-अमेरिकी दिग्दर्शक फ्रँक कॅपरा यांच्या संभाषणाचंही फुटेज आहे. डुंगरपूर यांच्याकडे भारतीय चित्रपटांच्या स्मृतिचिन्हांचाही संग्रह आहे. यात हजारो जुनी छायाचित्रं, फोटो निगेटिव्ह्ज आणि चित्रपट पोस्टर्सचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Shivendra Singh Dungarpur
भारताच्या लोप पावत चाललेल्या चित्रपट वारशाची जबाबदारी उचलण्याची गरज अमिताभ बच्चन यांनी कायमच बोलून दाखवली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकत्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते म्हणाले होते, "भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचं अपार योगदान दिलं आहे. आमची पिढी त्यांचं हे योगदान ओळखते. पण, दुर्दैवाने त्यांचे बहुतांश चित्रपट आज नष्ट झालेत किंवा भंगारात टाकण्यात आले आहेत."
"आपल्या चित्रपटाच्या वारशांपैकी खूप कमी आज शिल्लक आहे आणि जे काही उरलं आहे त्याच्या संवर्धनासाठी तातडीने पावलं उचलली नाही तर इथून 100 वर्षांनंतर आपल्या आधी जे होऊन गेलं आणि जे चलचित्र रुपात आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं त्याची कुठलीही आठवण देखील उरणार नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)



















