सयाजी सिलम: महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष तेलुगू भाषिक कसे झाले?

फोटो स्रोत, Social Media
- Author, पराग फाटक, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून तोडगा निघू शकला नाही. यानिमित्ताने राज्याच्या पहिल्यावहिल्या विधानसभा अध्यक्षांच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं तरी विधानसभा अध्यक्षांची निवड होऊ शकली नाही.
विधानसभा सभासद आणि अध्यक्ष, बृहन्मुंबई महानगर पालिकेत सभासद या राजकीय भूमिकांसह सयाजी सिलम यांनी सामाजिक क्षेत्रात तळमळीने काम केलं.
वंचित वर्गाला शिक्षण, नशाबंदी, सहकार चळवळ, खेळ संघटना अशा विविधांगी क्षेत्रात योगदान देताना सिलम यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची आजही दखल घेतली जाते.
तेलुगू भाषिक असलेल्या सिलम यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. पुद्दुचेरीचे राज्यपालपद त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं.
'मुंबईच्या उभारणीत तेलुगू समाजाचे योगदान' या मनोहर कदम लिखित पुस्तकात सयाजी सिलम यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
सिलम यांचं बहुआयामी योगदान
सिलम यांच्या निधनानंतर विधिमंडळात मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावात तत्कालीन मुख्यमंत्री बी.आर.अंतुले यांनी सविस्तर माहिती दिली.
"सयाजीराव लक्ष्मण सिलम यांचा जन्म 18 मे 1896 रोजी झाला. त्यांचं शिक्षण बी.ए, एलएलबीपर्यंत झालं होतं. 1946 ते 1949 या काळात सिलम हे मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस होते. 1941मध्ये त्यांची मुंबई मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती".

फोटो स्रोत, Hindustan Times
"मुंबई हिंदी सभा या संस्थेचे ते चिटणीस होते. मुंबई ऑटोमोबाईल एम्प्लॉईज युनियन आणि मुंबई इन्शुरन्स एम्प्लॉईज युनियन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं.
बृहन्मुंबई नशाबंदी मंडळाचे सदस्य तसंच नशाबंदी मंडळाच्या उद्घाटन समारंभाच्या समितीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी कार्य केलं.
मुंबई शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचे संबंध होते. मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते अतोनात झटले.
स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय राहिलेल्या सिलम यांनी तुरुंगवासही भोगला होता. 1922 ते 1946 या कालावधीत सिलम बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. महानगरपालिकेच्या स्थायी समिती कामकाज, बाजार व उद्यान या समित्यांचे प्रमुख आणि इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट कमिटी आणि शाळा समितीचे सदस्य होते. 1946 मध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला".
"मुंबई राज्य मागासवर्गीय मंडळावरही त्यांनी काम केलं. 1946 मध्ये सिलम मुंबई राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1937-38 काळात नशाबंदी आयुक्त म्हणून त्यांनी कार्य केलं.
टिळक मेमोरियल कमिटीचे सचिव, ऑनररी प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट्स ऑफ बॉम्बे सोसायटीचे अध्यक्ष तसंच मुंबई विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
1956 मध्ये मुंबई राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवड झाली. 1957 मध्ये मुंबई राज्य विधानसभेचे सदस्य आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली".
"1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान सिलम यांना मिळाला. 1962 पर्यंत ते विधानसभेचे अध्यक्ष होते.
1963 मध्ये सिलम यांची पुदुच्चेरी (तत्कालीन पाँडिचेरी) राज्याचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 1968 पर्यंत ते या पदावर होते.
5 जुलै 1980 रोजी वृद्धापकाळाने 85व्या वर्षी मुंबईत निधन झाले".
ज्वलंतकाळात अध्यक्षपद भूषवलं, नियमांची चौकट बसवण्यात योगदान
"गुंतागुंतीच्या काळात सिलम यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद होतं. 1957 साली संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न ज्वलंत स्वरुपाचा होता. सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यातील संख्यात्मक अंतर मर्यादित होतं. विरोधी पक्षात मातब्बर व्यक्ती होत्या. त्या काळात सभागृहाचं कामकाज चालवणं ही परीक्षाच होती. या परीक्षेत ते उत्तमरीत्या उत्तीर्ण झाले.
सभागृहाच्या अधिकारांचे जतन करण्यासाठी वेळप्रसंगी मंत्र्यांना समज देण्यासाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. कामकाज चालवण्याच्या दृष्टीने नियमांची चौकट बसवण्यात आणि त्याला सर्वसमावेशक स्वरुप देण्यात सिलम यांचं मोलाचं योगदान होतं", असं श.गो.पवार यांनी सिलम यांच्या कार्याचा गौरव केला होता.

फोटो स्रोत, The India Today Group
ते पुढे म्हणतात, "चार तप मुंबई तसंच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. राजकीय कार्यकर्ता आणि नेता याबरोबरीने समाज शिक्षणाची राबवण्यात त्यांचा पुढाकार होता. समाजातील गरीब वर्ग अज्ञानापासून दूर झाला नाही तर स्वातंत्र्याची फळं त्याला चाखता येणार नाही असं त्यांचं मत होतं. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी खूप काम केलं. हिंदी भाषेचा सामान्य माणसापर्यंत प्रसार व्हावा यासाठी वर्धा इथल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं काम अनेक वर्ष केलं".
"कुस्तीगीर परिषदेत त्यांनी महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं. या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी काम करताना लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता आणि आदर मी जवळून पाहिला आहे", असं पवार म्हणाले होते.
एका उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी घेत दिला राजीनामा
"सिलम मुंबई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत एका काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. हा पराभव ही आपली जबाबदारी आहे असं मानून सिलम यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नवीन कार्यकर्त्यांच्या हातात अध्यक्षपदाच्या जबाबदारीची सूत्रं दिली पाहिजेत असा आग्रह त्यांनी धरला होता", अशा शब्दात श. गो. पवार यांनी शोकप्रस्तावादरम्यान सिलम यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
सामाजिक संस्थांचा मार्गदर्शक हरपला
"सिलम यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा मार्गदर्शक हरपला", अशा शब्दांत हशु अडवाणी यांनी आदरांजली वाहिली होती.
"अनेक संस्था, संघटनांच्या वाटचालीत त्यांचं मोलाचं योगदान होतं. सिलम यांच्या निधनाने अनेक संस्थांनी तारणहार व्यक्ती गमावला आहे. महाराष्ट्र विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका यांचा भाग असताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं", असं अडवाणी यांनी म्हटलं होतं.
अध्यक्ष म्हणून वचक
"सिलम विधानसभेच्या अध्यक्षपदी असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे स्फोटक वातावरण होतं. विधानसभेत महागुजरात परिषद संयुक्त महाराष्ट्र समिती अशी आग्रही भूमिका घेणारी मंडळी होती. संवेदनशील वातावरण असतानाही सिलम यांनी समर्थपणे अध्यक्षपद भूषवलं. सर्वांवर त्यांचा वचक होता. त्यांनी साधा इशारा केला तरी सभागृहाचा कोणताही सभासद त्याला मान देत असे", असं दि.बा.पाटील यांनी सांगितलं.
भायखळा पुलाला सीलम यांचं नाव
तीनशे वर्षांपासून तेलुगू भाषिक महाराष्ट्रात आहेत. या समाजाच्या धुरिणांपैकी एक म्हणजे सयाजी सीलम. सीलम यांच्या योगदानाची दखल घेत भायखळ्याहून नागपाड्याला जाणाऱ्या पुलाला सयाजीराव सीलम यांचं नाव देण्यात आलं आहे. 'मुंबईवाले: टेक द हाय रोड' या रेचेल लोपेझ यांनी लिहिलेल्या बातमीत याचा उल्लेख आहे.
1695 मध्ये तेलुगू भाषिक समाज मुंबईत आला. तत्कालीन बॉम्बे प्रांत मराठ्यांकडे होता. कालौघात ब्रिटिशांनी अधिपत्य मिळवलं.
आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वाश्रमीचं व्हिक्टोरिया टर्मिनस) तसंच राजाबाई टॉवरच्या उभारणीत तेलुगू समाजाच्या मंडळींचं मोलाचं योगदान आहे.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE
1960मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात मराठी भाषिकांना तेलुगू समाजाने पाठिंबा दिला होता.
तेलगू भाषिकांसाठी 'तेलुगू मित्र' या पुस्तिकेचं संपादन सिलम यांनी केलं होतं.
अध्यक्ष म्हणून निःपक्षपाती कारभार
"द्विभाषिक राज्याचे आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सयाजीराव सिलम यांनी अतिशय समर्थपणे काम केलं. नि:पक्षपाती कारभार हे त्यांच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य होतं.
विरोधकांवर अन्याय होऊ न देता ते कामकाज सांभाळायचे. आदर्शवादी अध्यक्ष असं त्यांचं वर्णन करता येईल", असं ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



















