कॉमनवेल्थ गेम्स 2018 : बॅडमिंटनमध्ये टीम इंडियाला गोल्ड

फोटो स्रोत, Reuters
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आज 10वं गोल्ड जमा झालं. बॅडमिंटनच्या मिक्स टीम इव्हेंटमध्ये भारतीय टीमला हे गोल्ड मिळालं.
भारताच्या टीमनं मलेशियाला 3- 1 असं हरवत बॅडमिंटन स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आणि सुवर्णपदक जिंकलं. भारतीय बॅडमिंटन टीममध्ये साईना नेहवाल, अश्विनी पोनप्पा, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज, किदंबी श्रीकांत यांचा समावेश होता.
त्याअगोदर 17 वर्षीय मेहुली घोषने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. अपूर्वी चंडेलाने याच प्रकारात कांस्यपदक पटकावलं.
पश्चिम बंगालमधल्या सिरमपूरची मेहुली टीव्हीवरच्या सीआयडी मालिकेची चाहती आहे. इन्स्पेक्टर दया तिला प्रचंड आवडतो. प्रसिद्ध अशा शोल चित्रपटातला जय-वीरू यांच्यातलं नेमबाजीचं दृश्यं पाहायला तिला आवडतं. बंदूक, पिस्तूल आणि नेमबाजीची आवड बहुधा यातूनच रुजली असावी.
14 व्या वर्षी घडलेला एक प्रसंग मेहुलीच्या आयुष्यात निर्णायक ठरला. नेमबाजीची प्रॅक्टिस सुरू असताना मेहुलीच्या बंदूकीतून सुटलेल्या गोळीनं एक व्यक्ती जखमी झाला. यामुळे मेहुलीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या घटनेमुळे मेहुली अनेक दिवस नैराश्यग्रस्त होती. यातून बाहेर पडण्यासाठी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. याप्रकरणानं हताश मेहुलीच्या पालकांनी तिला अव्वल नेमबाज जॉयदीप कर्माकर यांच्या अकादमीत भरती केलं.

फोटो स्रोत, Joydeep Karmarkar shooting academy
रोज तीन ते चार प्रवास करून मेहुली कर्माकर यांच्या अकादमीत जात असे. अनेकदा प्रशिक्षण संपवून घरी पोहोचायला मेहुलीला रात्र होत असे.
हळूहळू मानसिक धक्क्यातून मेहुली सावरली आणि तिचा खेळ बहरला. 2016 आणि 2017 या दोन वर्षांत मेहुलीनं राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं पटकावली.
2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये जॉयदीप यांचं पदक अवघ्या काही गुणांनी हुकलं होतं. मोठ्या स्पर्धांमध्ये मानसिक कणखरता कुठे कमी पडते हे जाणून जॉयदीप यांनी आपल्या विद्यार्थ्यांना कणखर बनवलं.
नेमबाजी विश्वचषकात मेहुलीच्या नावावर दोन पदकं आहेत. गोल्डकोस्ट येथे होणारी कॉमनवेल्थ स्पर्धा हे मेहुलीचं कॉमनवेल्थ पदार्पण आहे. मात्र पदार्पणाचं दडपण बाजूला सारत 17 वर्षीय मेहूलीनं रौप्यपदक मिळवलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















