#5मोठ्याबातम्या : मुठा कालवा फुटायला उंदीर, घुशी जबाबदार - गिरीश महाजन

फोटो स्रोत, Twitter
1. उंदीर, घुशींमुळे कालवा फुटवा - गिरीश महाजन
गुरुवारी कालवा फुटून लोकांच्या घरात पाणी घुसले. या घटनेची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कालव्याची पाहाणी केली. हा कालवा उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे फुटल्याचे त्यांनी सांगितले, असं झी24तासनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
पुणे शहरातून वाहणारा खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी फुटला. त्यामुळे पर्वती लगतच्या जनता वसाहतीत पाणी घुसले आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
2. 'इंग्रजी भाषा नाही तर आंग्ल मानसिकता'

फोटो स्रोत, Getty Images
"इंग्रजी ही भाषा नाही, तर ती 'आंग्ल मानसिकता' आहे. इंग्रज ग्रेट होते, आपल्याकडे काहीच नव्हते अशी मानसिकता गेली अनेक वर्षे आपल्याकडे रुजली आहे," असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. पणजी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ते बोलत होते. हे वृत्त हहिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.
यापूर्वी नवी दिल्लीत राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त आयोजित केलेल्या भाषणात त्यांनी इंग्रजी भाषेवर मत व्यक्त केलं होतं. याचा संदर्भ देत ते म्हणाले, "माझ्या भाषणाचा काही माध्यमांनी विपर्यास केला."
"आंग्ल मानसिकतेतून आपण अजूनही बाहेर आलेलो नाही. इंग्रजी भाषा म्हणून उपयुक्त आहे. मात्र, त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिकतेचे काय," असा सवालही नायडू यांनी केला असल्याचे या बातमीमध्ये म्हटलं आहे.
3. शिवसेनेचे आमदार खासदार आमने-सामने
कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःच्याच पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहे, हे वृत्त लोकमत न्यूज 18नं दिलं आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा देत उपोषण केलं होतं. त्यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर पक्षातून आदेश आल्यानंतर त्यांनी माघार घेतली, असं या बातमीत म्हटलं आहे.
4. काहीतरी मोठं घडलं आहे, राजनाथ सिंह यांचं सूचक वक्तव्य
भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत कारवाई केल्याची सूचक माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.
"काहीतरी घडलं आहे, पण नेमकं काय झालं ते मी सांगणार नाही. जे झालं ते व्यवस्थित झालं आहे आणि भविष्यातही होत राहील," असं ते म्हणाले असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. मुझफ्फरनगर येथे एका कार्यक्रमात सर्जिकल स्ट्राइकच्या दोन वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
5. अमित शहा आणि मोदी यांची पाकिस्तानच्या ISIशी 'महायुती' - काँग्रेस
अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIशी महायुती असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. हे वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

फोटो स्रोत, EPA
पठाणकोट हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी ISIला तपासणीसाठी निमंत्रित केलं होतं. ISIचे माजी प्रमुख असद दुर्रानी यांनी भारताच्या पंतप्रधानपदासाठी आमचा सर्वांत आवडता पर्याय नरेंद्र मोदी हे आहेत, असं वक्तव्य केलं होतं, असा दावा सुरजेवाल यांनी केला आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय महागठबंधन उभं करत आहेत, का असा सवाल अमित शहा यांनी केला होता. राहुल गांधी म्हणतात मोदी हटाव, पाकिस्तान म्हणतं मोदी हटाव. राहुल गांधीच्या आरोपांना पाकिस्तान पाठबळ देत आहे, अशी टीका शहा यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुरजेवाल यांनी ही टीका केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















