मेगन आणि हॅरी यांच्याकडे गुडन्यूज : डचेस आहेत गरोदर

फोटो स्रोत, EPA
'डचेस ऑफ ससेक्स' अर्थात मेगन आणि ड्यूक ऑफ ससेक्स हॅरी यांच्याकडे 'गुड न्यूज' आहे.
पुढच्या उन्हाळ्यात मेगन यांना बाळ होईल, अशी माहिती केन्सिंगटन पॅलेसने जाहीर केली आहे. मेगन आणि हॅरी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत.
"मे महिन्यात झालेल्या शाही लग्नापासून तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. नव्या पाहुण्याच्या आगमनाची वार्ता सगळ्यांना सांगताना अतिशय आनंद होत आहे," अशा शब्दांत दांपत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
हॅरी हे राणी एलिझाबेथ यांचे नातू आणि प्रिन्स चार्ल्स यांचा द्वितीय चिरंजीव आहेत. होणारं बाळ सिंहासनाचं सातवं दावेदार असेल.
शनिवारी प्रिन्सेस युजिनी यांच्या लग्नाला ही जोडी उपस्थित होती. तेव्हा मेगन गडद रंगाच्या कोटमध्ये होत्या. त्याच वेळी त्यांच्या गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली होती.
या चर्चेला आणखी उधाण तेव्हा आलं जेव्हा सिडनीत मेगन पोटासमोर दोन मोठे फोल्डर्स धरून उभ्या होत्या.
लग्न झाल्यानंतर या दोघांचाही ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच दौरा आहे.
मंगळवारी ते पहिल्यांदा जाहीरपणे लोकांसमोर येणार आहेत. तेव्हा या दोघांचे हितचिंतक या जोडप्याला शुभेच्छा देणार आहेत.
मेगन आणि हॅरी आपल्या प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांच्या पावलावर पाऊल टाकत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत.
बीबीसीचे राजघराण्याचे प्रतिनिधी जॉनी डेमंड रविवारी सिडनीमध्ये होते. शुक्रवारी पार पडलेल्या विवाहसोहळ्याबाबत ते म्हणाले, "तिथंच ड्यूक आणि डचेस यांनी राजघराण्याच्या सगळ्यांत ज्येष्ठ सदस्यांना ही गोड बातमी कळवली."
"आधी राणीला कळवण्यात आलं. नंतर इतर सदस्यांना ही बातमी कळवण्यात आली. नंतर इतरांना ही बातमी कळवण्यासाठी या दिवसाची निवड केली. आता ही बातमी आपणा सगळ्यांना कळवण्यात आली," असं ते पुढे म्हणाले.
या गोड बातमीमुळे सर्वदूर आनंदाची लहर पसरली आहे. हॅरी यांच्या सासूबाई आणि मेगन यांची आई डोरीया या बातमीनं आनंदित झाल्या आहेत.
पंतप्रधान थेरेसा मे यांनीदेखील या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. "मी दोघांचंही अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




















