व्हीडिओ : वि. स. खांडेकर शिरोड्याच्या या शाळेत शिकवायचे
वि. स. खांडेकर हे नाव घेतलं की पहिले आठवतं ते 'ययाती'. याच कादंबरीसाठी त्यांना 1960 साली साहित्य अकादमी आणि 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या आठवणी कोकणातल्या एका शाळेने आजही जपून ठेवल्या आहेत.
1915 मध्ये 'गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय' सुरू झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे गावातली ती पहिलीच शाळा. पण मूळचे सांगलीचे खांडेकर इथे कसे आले?
वि. स. किंवा विष्णू सखाराम खांडेकर यांना लहानपणी त्यांच्या चुलत्याने दत्तक घेतलं आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात नाणेली इथं आले.
1920 साली घनश्याम आसगावकर मास्तरांच्या बोलावण्यावरून खांडेकर शिरोड्यात शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून 1938 पर्यंत खांडेकर या शाळेत मुख्याध्यापक होते.
गुडघ्यापर्यंत पंचेवजा धोतर, मळकट सदरा आणि हातात पुस्तकं अशा वेषातले खांडेकर मास्तर शिक्षणासाठी खूप आग्रही होते. त्याकाळी खांडेकर यांनी गरीब विद्यार्थी फंड सुरू केला. यासाठी खांडेकर स्वतः गावच्या दशावतारी जत्रेत गळ्यात फंडपेटी बांधून पैसे गोळा करायचे. या फंडातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जायचं.
विशेष म्हणजे आज इतक्या वर्षानंतरही हा फंड सुरू आहे, ज्यातून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
"सध्या या शाळेत जवळपास दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, यापैकी 50 टक्के मुली आहेत तर 27 शिक्षक या शाळेत शिक्षण देतात," या शाळेचे माजी प्राचार्य चंद्रकांत ओटवणेकर यांनी बीबीसीला सांगितलं.
"1960 पर्यंत या भागात शिरोड्याव्यतिरिक्त एकही शाळा नव्हती. त्यामुळे त्या काळात कोकणातीलच नाही तर गोव्याहून देखील दोन खाड्या पार करून विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी यायचे," असं त्यांनी सांगितलं.
शिरोड्याला स्वातंत्र्य लढ्याचा ही इतिहास आहे. 1930 साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी इथंही गांधीजींच्या शिष्यांनी ब्रिटिशांच्या लाठ्या झेलल्या होत्या.
असे हे खांडेकर गुरूजी यादरम्यान साहित्यातही मोठे झाले. त्यांनी 30 हून अधिक कादंबऱ्या आणि पुस्तकांचं लिखाण केलं.
1974 साली खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक झाले.
त्यानंतर दोनच वर्षांनी, म्हणजे 2 सप्टेंबर 1976 रोजी त्यांचं निधन झालं. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाहा स्वाती पाटील-राजगोळकर यांचा सिंधुदुर्गहून हा खास व्हीडिओ रिपोर्ट, त्याच शाळेतून.
व्हीडिओ निर्मिती - गणेश पोळ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)