अण्णा हजारे यांच्या वजनात घट, उपोषण सोडण्याचा सरकारचा प्रयत्न : बीबीसी मराठी राउंडअप

आण्णा हजारे

फोटो स्रोत, GANESH BHAPKAR

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

1) अण्णा हजारे यांच्या वजनात घट, डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

लोकपाल नियुक्तीच्या मागणीवरून समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथे बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांचं वजन घटलं असून रक्तदाबात चढउतार होत आहे.

तर हजारे यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावं, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

लोकपालची नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी हजारे उपोषण करत आहेत. उपोषणामुळे त्यांचं वजन तीन किलोनी कमी झालं आहे.

अण्णांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या टीममधील डॉ. भारत साळवे यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितलं की, "अण्णांची तब्येत खालावली असून त्यांच्या यकृतातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढत आहे. वाचा संपूर्ण बातमी इथे.

2) आनंद तेलतुंबडे यांची सुटका : पुणे सत्र न्यायालयाचे आदेश

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असून त्यांना तातडीने मुक्त करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. तेलतुंबडे यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली होती.

आजच्या निर्णयाचा मला आनंद आहे, पण शुक्रवारपासून मी जो अपमान भोगला आहे, तो वर्णन करता येण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया तेलतुंबडे यांनी दिली. वाचा काल दिवसभरात पुणे, दिल्ली आणि मुंबईत काय काय घडलं.

3) जपान आणि युरोपियन युनियन यांच्यात जगातील सर्वांत मोठा व्यापारी करार

जपान आणि युरोपियन युनियन यांच्यात जगातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा व्यापारी करार झालेला आहे. जागतिक GDPचा तिसरा हिस्सा आणि 63.50 कोटी लोकसंख्या असा या कराराचा परीघ आहे.

युरोपियन युनियन आणि जपान यांच्यातील करार

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात जर कोणत्याही कराराशिवाय ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं, तर ब्रिटनला या कराराचा कोणताही लाभ होणार नाही.

या करारामुळे जपानला वाईन आणि चीज कमी किमतीत तर युरोपियन युनियनला वाहनं कमी किमतीत मिळणार आहेत.

अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेडवॉरच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा करार झालेला आहे.

4) पालघर भूकंप : एका दिवशी सहा धक्के, NDRFचं पथक तैनात

शुक्रवारी भूकंपाच्या सहा धक्क्यांनी पालघर आणि परिसर हादरला. या भूकंपामध्ये २ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे प्रांरभिक माहितीमधून स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का रिश्टर स्केलवर 3.3 इतक्या तीव्रतेचा मोजण्यात आला.

त्यानंतर सकाळी 10.03, 10.29 वाजता तर दुपारी 2.06, 3.53 आणि सायंकाळी 4.57 वाजता भूकंपाचे धक्के बसले.

दुपारी 14.06 मिनिटांनी बसलेला धक्का 4.1 रिश्टर तीव्रतेचा होता. इतर सर्व धक्के 3.0 रिश्टर ते 3.6 रिश्टर दरम्यान होते.

5) शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट होईल का?

2022 पर्यंत शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न दुप्पट होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016मध्ये केला होता. पण ते कितपत शक्य आहे?

शेतकरी

फोटो स्रोत, Getty Images

मोदी सरकारच्या काळात संतप्त शेतकऱ्यांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत.

शेती मालाला चांगला भाव मिळावा, अशी त्यांची मागणी होती.

केंद्र सरकारनं शेतकऱ्याच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या आहेत. पण तज्ज्ञांच्या मते 2022 पर्यंत शेतीचं उत्पन्न दुप्पट होणं शक्य नाही. GDPमधला शेतीचा वाटा कमी होत असला तरी देशात 40 टक्क्याहून अधिक लोकांना शेतीमधून रोजगार मिळत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)